मिरॅ असेट प्रुडन्स फंड (रेग्युलर प्लान) एक दृष्टिक्षेप..

अर्थशास्त्राचे या वर्षीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते प्रा. रिचर्ड थेलर हे अर्थशास्त्रीय वर्तनाचे अभ्यासक आहेत. ज्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. रघुराम राजन अध्यापन करतात तेथेच प्रा. रिचर्ड थेलर हेसुद्धा प्राध्यापकी करतात हा योगायोग. डॉ. रघुराम राजन यांनी केवळ वस्तुनिष्ठ आकडेवारीच्या निष्कर्षांवर अर्थव्यवस्थेची गती संथ होण्याचे गृहीतक मांडले होते. तर मानवी भावभावना आणि आर्थिक वर्तन हा प्रा. रिचर्ड थेलर यांच्या संशोधनाचा विषय आहे. गुंतवणूकदाराच्या आर्थिक वर्तनाचा आणि भावभावनांचा जवळून संबंध असतो आणि म्हणून एखादे आर्थिक विषयाशी निगडित मॉडेल विकसित करताना मानवी भावभावनांना त्यात स्थान असायला हवे हे त्यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केले. गुंतवणूकदारांना मूलत: भीती आणि लालसा या दोन भावनांवर ताबा मिळविल्यास एक यशस्वी गुंतवणूकदार होता येते. गुंतवणूकविषयक निर्णय घेताना ज्या काही मानवी भावनांचा जवळून संबंध येतो त्यापैकी अतिआत्मविश्वास हा दोष अनेक गुंतवणूकदारांना मारक ठरतो. नाममुद्रा परिचित असणे आणि त्यामुळे ते उत्पादन खरेदी करताना विश्वास वाटणे ही महत्त्वाची भावना आहे. अनेक नाममुद्रा जशा गुंतवणूकदारांना ज्ञात नसतात तशा त्या विक्रेते किंवा सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार यांनासुद्धा या नाममुद्रांबाबत ठाम विश्वास नसतो. आजची फंड शिफारस असलेले मिरॅ हे फंड घराणेही असेच दर्दी गुंतवणूकदार वगळता फारसे परिचित नाही. या फंड घराण्याच्या मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिग इक्विटी या फंडाला कर्ते म्युच्युअल फंडाच्या यादीत पहिल्या वर्षांपासून स्थान आहे. सल्लागाराने या फंडात गुंतवणुकीची शिफारस केल्यावर हा फंड टाळण्याकडेच गुंतवणूकदारांचा कल असतो. पोथीनिष्ठ गुंतवणूक सल्लागार तर या फंडाला आपल्या शिफारशीत स्थान देत नाहीत. ३० जुलै २०१५ रोजी पहिली एनएएव्ही जाहीर झालेल्या आणि अवघे सव्वा दोन वर्षे वयोमान असलेल्या या बॅलंस्ड फंडाचा परतावा अनेक वर्षांचा वारसा असलेल्या बॅलंस्ड फंडाच्या परताव्याहून अधिक आहे. प्रा. रिचर्ड थेलर यांनी संशोधनांती काढलेल्या निष्कर्षांचा हा फंड वस्तुनिष्ठ परिपाठ आहे. अस्तित्वात येऊन सव्वा दोन वर्षे झालेला आणि फारसे परिचित नसलेल्या फंड घराण्याच्या या फंडाची दिवाळी विशेष म्हणून शिफारस करीत आहे.

मिरॅ असेट प्रुडन्स फंडात ३० जुलै २०१५ या दिवशी ५,००० रुपयांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीला (एसआयपी) सुरुवात केलेल्या गुंतवणूकदाराने १४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत १.३५ लाखाची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचे १४ ऑक्टोबर २०१७ च्या रेग्युलर ग्रोथ ‘एनएव्ही’नुसार मूल्य १.६४ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १८.६४ टक्के आहे. ३० जुलै २०१५ या दिवशी फंडात केलेल्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे १.३१ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १३.४१ टक्के आहे. एकूण समभाग गुंतवणुकीच्या ६५ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारच्या (भांडवली मूल्यानुसार पहिल्या १०० कंपन्या) समभागात करणारा फंड आहे. नीलेश सुराणा या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असून फंडाच्या गुंतवणुकीशी संबंधित आहेत. सुधीर केडिया हे या फंड घराण्यात दाखल झाल्यानंतर ९ ऑगस्ट २०१६ पासून त्यांची नेमणूक फंडाचे सह-निधी व्यवस्थापक म्हणून झाली आहे. फंडातील समभाग गुंतवणुकीसाठी ७३ टक्के ही सरासरी मर्यादा आखण्यात आलेली असून या मर्यादेत अधिक-उणे २ टक्के फरक करता येतो. आधी निश्चित केलेल्या मूल्यांकनानुसार बाजार निर्देशांक वरच्या पातळीवर असतात तेव्हा समभाग गुंतवणूक ७२-७३ टक्के इतकी असते तर निर्देशांक खालच्या पातळीवर असताना समभाग गुंतवणूक ७५ टक्के असते. या समभाग गुंतवणुकीपैकी ८५ टक्के गुंतवणूक ‘सेबी’ने निश्चित केलेल्या निकषांनुसार लार्ज कॅप समभागांत केलेली आहे. १५ ते १८ टक्के गुंतवणूक मिड अँड स्मॉल कॅप प्रकारात केलेली आहे. एकूण गुंतवणुकीच्या ३० ते ३५ टक्के गुंतवणूक रोख्यांत केलेली असते. महेंद्र जाजू हे रोखे निधी व्यवस्थापक आहेत. म्युच्युअल फंडांच्या वर्गीकरणासाठी ‘सेबी’ने नवीन नियम निश्चित केले आहेत. या निकषांनुसार हा फंड ‘इक्विटी ओरिएंटेड हायब्रीड फंड’ या फंड गटात मोडतो. ३० सप्टेंबर २०१७ रोजी फंडाची मालमत्ता ७९५ कोटी रुपये होती.

परतावा मिळविण्यासाठी हा फंड समभाग केंद्रित जोखमीपेक्षा गुंतवणुकीत आवश्यक तितकेच वैविध्य आणून ‘बॉटम्स अप अ‍ॅप्रोच’ पद्धतीने गुंतवणुकीसाठी समभागांची निवड होते. फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक असलेले एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, ग्रासिम आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे आहेत. फंडाचे गुंतवणूक विवरण पत्रक पाहता फंडाने गुंतवणुकीसाठी उपभोगाला (कंझम्शन) प्राधान्य देत समभागांची निवड करताना इन्फोसिस पहिल्या पाच गुंतवणुकांत असूनदेखील फंडाने माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्माण उद्योगांत निर्देशांकापेक्षा कमी गुंतवणूक केली आहे.

‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अ‍ॅग्रेसिव्ह इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. रोखे गुंतवणुकीत केंद्र सरकारचे अनुक्रमे २०२७, २०२५ आणि २०२९ मध्ये मुदतपूर्ती असलेले रोखे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत तर २०१५ मध्ये मुदतपूर्ती असलेले पॉवर ग्रीड आणि २०२१ मध्ये मुदतपूर्ती असलेले पॉवर फायनान्स कॉपरेरेशन चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

हायब्रीड फंडांना गुंतवणूकदारांची पसंती लाभली आहे. ही पसंती लाभण्यास संभाव्य करणे आहेत त्यापैकी अनेक हायब्रीड फंडांनी मासिक लाभांश जाहीर करण्यास सुरुवात करणे हे आहे. बँकाचे कमी होणारे व्याजदर आणि त्याच वेळी फंडांनी मासिक लाभांश जाहीर करण्यास सुरुवात करणे हे असले तरी सर्वच गुंतवणूकदार नियमित उत्पन्नासाठी हायब्रीड फंडात गुंतवणूक करीत नाहीत. हा फंड लार्जकॅप केंद्रित हायब्रीड फंड असल्याने हा फंड नियमित उत्पन्नापेक्षा भांडवली वृद्धीसाठी हा फंड एक चांगली गुंतवणूक असू शकेल. रेटिंग नसलेला आणि अपरिचित नाममुद्रा असल्याने गुंतवणूकदारांचा कल या फंडाचा समावेश प्राधान्याने आपल्या गुंतवणुकीत न करण्याची शक्यता आहे. हा फंड लार्जकॅप केंद्रित असल्याने एनएव्हीत कमी चढ-उतार असलेला म्हणून गुंतवणुकीसाठी कमी धोकादायक असलेला हा फंड आहे. अवघे सव्वा दोन वर्षे वय असलेल्या या राजस सुकुमाराने दीर्घ परंपरा असलेल्या बॅलंस्ड फंडांना एक वर्षांच्या परताव्यात मागे सरलेले असल्याने भांडवली वृद्धीसाठी आणि विशेषत: सेवानिवृत्तीपश्चातच्या बचतीसाठी निवड करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा राजस सुकुमार निश्चितच निराश करणार नाही अशी खात्री वाटते.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com