कुठल्या प्रकारच्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीत कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचे किती प्रमाण असावे हे त्या गुंतवणूकदारांच्या जोखीम सोसण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. तथापि, अनुभव असा की, बहुसंख्य गुंतवणूकदार मालमत्तेचा समावेश हा आपल्या जोखीम क्षमतेनुसार करावयास तयार होत नाहीत..

कमावत्या वयात कष्टाने मिळविलेल्या पैशाची गुंतवणूक भविष्यातील तरतुदीसाठी प्रत्येकजण करीत असतो. ही भविष्यातील तरतूद करण्यामागचे वित्तीय उद्दिष्ट काही महिन्यांपासून काही दशकांपर्यंत असण्याची शक्यता असते. गुंतवणुकीचा कालावधी जितका अधिक तितका धोका अधिक व परतावासुद्धा अधिक असतो. गुंतवणुकीचे नियोजन यशस्वी होण्यासाठी गुंतवणूकदाराची जोखीम सहन करण्याची पातळी व गुंतवणुकीतील जोखीम सम पातळीवर असणे गरजेचे असते. नियोजनदरम्यान गुंतवणूकदाराच्या जोखीम पातळीचे मापन होणे आवश्यक असते. गुंतवणूकदाराच्या जोखमीचे मापन प्रामुख्याने तीन पातळ्यावर होते.

जोखीम क्षमता: जोखीम क्षमता ही प्रामुख्याने वय व गुंतवणूकयोग्य रक्कम यावर अवलंबून असते.

जोखीम स्वीकारण्याची आवश्यकता: विशिष्ट कालावधीत वित्तीय ध्येये गाठण्यासाठी आवश्यक ती जोखीम स्वीकारण्याची गरज निर्माण होते. ही गरज प्रामुख्याने वित्तीय ध्येये गाठण्यासाठी बचतीची कमतरता किंवा अपुऱ्या साधनसंपत्तीमुळे निर्माण होते.

जोखीम स्वीकारून बाजाराच्या चढ-उतारांना सक्षमपणे सामोरे जाण्याच्या  मानसिकतेला चाचपण्याच्या तीन चाचण्या आहेत. पहिल्या दोन चाचण्या या आर्थिक परिमाणाशी संबंधित आहेत, तर तिसरी ही गुंतवणूकदाराच्या व्यक्तिमत्त्वाशी किंवा त्याच्या मानसिकतेशी संबंधित आहे. आर्थिक नियोजन करताना या तिन्ही अंगांचा विचार करून नियोजित गुंतवणूक सुचविली जाते. गुंतवणूकदारांच्या अपेक्षा व जोखीम स्वीकारण्याची क्षमता यांच्यात नेहमीच तफावत असते. उदाहरणार्थ, एखाद्या नव्याने नोकरीस लागलेल्या तरुणास १ कोटीचा निवृत्तीकोश जमविणे गरजेचे वाटेल. यासाठी जर तो मासिक २ हजार २५ वर्षांसाठी गुंतविण्यास तयार असेल तर त्याच्यापुढे दोन पर्याय आहेत. पहिला आयुर्विमा, बँक मुदत ठेवी व सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)सारख्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करणे. हा नोकरदार जर जोखीम टाळणारा असेल तर तो स्थिर उत्पन्न गुंतवणूक साधनाची निवड करेल. प्रत्यक्षात पीपीएफ व बँकांच्या मुदत ठेवी यांचे दर कालातीत नसून ठरावीक कालावधीनंतर (सध्या तिमाहीगणिक) बदलतात, तर विमा योजना या निश्चित स्वरूपाचा परतावा देतात. एखाद्या विमा योजनेत या इच्छुकाने दर महिना २,००० रुपयांची २५ वर्षे गुंतवणूक केल्यास प्रचलित विमा उत्पादनाप्रमाणे ६ लाखांच्या गुंतवणुकीचे १२,८९,९६० रुपये विमा योजनेच्या मुदतपूर्तीनंतर निश्चित मिळतील. हेच दरमहा २,००० रुपये म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेत गुंतविल्यास प्रचलित परतावा दर लक्षात घेतल्यास, ३८ लाखांपर्यंतची रक्कम २५ वर्षांनंतर हाती पडू शकेल. परंतु ही रक्कम हाती पडेलच याची खात्री देता येत नाही. दरम्यानच्या काळात बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणुकीचे बाजारमूल्य गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा कमी होण्याची शक्यता गुंतवणूकदाराने ध्यानात घेणे गरजेचे आहे. याच गुंतवणूकदाराकडे पुरेशी बचत नसेल तर वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जोखमीचा सामना अपरिहार्य आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी रक्कम जमा करण्यास केलेली सुरुवात, त्या उलट वयाच्या ४५ व्या वर्षी केलेली सुरुवात दोहोंतील जोखीम वेगवेगळी असते. गुंतवणुकीस उशिरा सुरुवात केल्यास वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिरिक्त जोखीम स्वीकारणे अपरिहार्य ठरते.

चांगला सल्लागार नेहमीच आपल्या अशिलाची जोखीम क्षमता निश्चित करण्यात बराच वेळ खर्च करतो. ही चाचणी गुणात्मक असली तरी निर्णायक मापन करण्यासाठी चाचणीचा निकाल संख्यात्मक पद्धतीने निश्चित करणे गरजेचे असते. संख्यात्मक निकाल निश्चितीसाठी ‘फिनामेट्रिका’ ही पद्धत सर्वमान्य असून बहुसंख्य आर्थिक नियोजक आपल्या अशिलाची जोखीम क्षमता मोजण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करतात. सर्वसाधारणपणे जोखीम चाचणीच्या गुणांकनाप्रमाणे गुंतवणूकदरांची विभागणी पाच गटांत केलेली असून २५ पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्यांची गणना जोखीम स्वीकारण्यास असमर्थ गुंतवणूकदार अशी केली असून जोखीम स्वीकारण्याच्या मापनपट्टीकेवर सर्वात खालच्या थराला, तर चाचणीत ८५ पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुंतवणूकदारांची संभावना साहसी गुंतवणूकदार अशी केली आहे. गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुसार मालमत्तेची विभागणी केली जाते.

कुठल्या प्रकारच्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीत कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचे किती प्रमाण असावे हे या चाचणीचे फलित आहे.

बहुसंख्य गुंतवणूकदार मालमत्तेचा समावेश हा आपल्या जोखीम क्षमतेनुसार करावयास तयार होत नाहीत. कमी परताव्याचा दर देणाऱ्या कमी जोखमीचे मालमत्ता प्रकार टाळण्याकडे बहुसंख्य गुंतवणूकदारांचा कल असतो. गुंतवणूकदाराच्या आर्थिक व्यक्तिमत्त्व प्रकारानुसार गुंतवणुकीचे वर्तन असेल तर गुंतवणुकीत यश मिळते, हे विसरता कामा नये.

अजित प्रभाकर मंजुरे AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.