निवृत्तीपश्चात बहुतांश मंडळी बँकेच्या मुदत ठेवींवर अवलंबून असतात. दरमहा वेतनाद्वारे मिळणारे नियमित उत्पन्न थांबल्यानंतर उदरनिर्वाहासाठी आपल्या या बचतीवरील परतावा हाच या मंडळींचा आधार असतो. काही गुंतवणूकदार हे कंपन्यांच्या मुदत ठेवी, तर काही अपरिवर्तनीय रोख्यांवर मिळणाऱ्या व्याजाचा आधार घेतात. या पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा नियमित परतावा मिळविण्याचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील ‘एसडब्ल्यूपी’ अर्थात ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ हा एक चांगला मार्ग आहे. ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ याचा ढोबळ अर्थ – आपल्या बचतीतून नियमितपणे खर्चाला आवश्यक इतकी रक्कम काढून घेणे. कमावत्या वयात ‘एसआयपी’ अर्थात नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून जमापुंजी एकरकमी न काढता, खर्चापुरती थोडय़ा प्रमाणात मिळवीत राहण्याचा हा मार्ग आहे. ही रक्कम मासिक, त्रमासिक, अर्ध वार्षिक आणि वार्षिक रूपात काढता येते.

‘एसडब्ल्यूपी’ची प्रक्रिया कशी?

Mephedrone Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Redevelopment of Abhyudaya Nagar Colony through open tender
मुंबई : खुल्या निविदेद्वारे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास

म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीची ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट  प्लान -एसआयपी’ पद्धत गुंतवणूकदारांना आता चांगलीच परिचित आहे. निश्चित केलेल्या योजनेत गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदाराच्या बचत खात्यातून विशिष्ट रक्कम पूर्व निर्धारित तारखेला वळती होते. त्या रकमेची म्युच्युअल फंडाची युनिट्स त्या त्या वेळी असलेल्या मूल्यानुरूप खरेदी केली जातात. त्याच्या नेमके उलट सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) ही पद्धत आहे. ही अशी सुविधा आहे जी एखाद्या गुंतवणूकदारास पूर्वनिर्धारित कालांतराने अस्तित्वात असलेल्या म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याची परवानगी देते. अशा तऱ्हेने पद्धतशीर काढून घेतलेल्या पैशाची दुसऱ्या फंडात पुनर्गुतवणूक केली जाऊ  शकते किंवा या रकमेचा गुंतवणूकदाराकडून वर म्हटल्याप्रमाणे उदरनिर्वाहाचा खर्च भागविण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

‘एसआयपी’प्रमाणे ‘एसडब्यूपी’साठी म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला फंड घराण्याला पूर्वनोंदणी करून सूचित करणे आवश्यक असते. गुंतवणूकदाराच्या एसडब्ल्यूपीच्या अर्जाची म्युच्युअल फंड घराण्याकडे नोंद झाल्यानंतर फंड घराणे गुंतवणूकदाराला आवश्यक आहे तितक्या मूल्याच्या युनिट्सची विक्री करून ती रक्कम गुंतवणूकदाराच्या बचत खात्यात जमा करते.

कर-पात्रता?

‘एसडब्ल्यूपी’द्वारे नियमितपणे काढल्या जाणाऱ्या रकमेवर गुंतवणूकदाराला प्राप्तिकर भरावा लागेल काय? असा एक स्वाभाविक प्रश्न पुढे येतो. तर या रकमेवरील कर आकारणी गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असते. समभाग गुंतवणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारी नफ्याची रक्कम ही करमुक्त असते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी समभागसंलग्न (इक्विटी) फंडात एक वर्ष आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करून ‘एसडब्ल्यूपी’साठी अर्ज केला असेल, तर त्याला होणारी प्राप्ती ही करमुक्त असेल. तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातून तीन वर्षांनंतर ‘एसडब्ल्यूपी’द्वारे काढलेल्या रकमेवर अल्प मुदतीचा भांडवली लाभ कर लागू होईल. तथापि इंडेक्सेशनचा लाभ गुंतवणूकदारास मिळतो. ज्यामुळे प्राप्त रकमेवर कर आकारणी किमान राखली जाते.

एसडब्ल्यूपी की एमआयपी,दोन्हीत सरस काय?

म्युच्युअल फंडांची मासिक उत्पन्न योजना (मन्थली इन्कम प्लान्स – एमआयपी) आहेत. अर्थात एमआयपीच्या तुलनेत ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ हा पर्याय अनेकांगाने सरस आहे आणि त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. सर्वप्रथम दोहोंमध्ये तुलना न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, ‘एमआयपी’ ही गुंतवणुकीची एक योजना आहे, तर एसडब्ल्यूपी ही म्युच्युअल फंडांची कोणती योजना नव्हे, तर अस्तित्वात असलेल्या कोणत्याही योजनेतील गुंतवणूकदाराला उपलब्ध करून दिली गेलेली ती एक नियमित प्राप्तीची सुविधा आहे. एकदा एसडब्ल्यूपीसाठी गुंतवणूकदाराने अर्ज केला त्याला त्याच्या अस्तित्वात असलेल्या गुंतवणुकीतून ठरलेल्या तारखेला अपेक्षिलेला लाभ मिळत जाईल. त्याउलट एमआयपीमध्ये अशा मासिक लाभांशाची निश्चिती नसते अथवा हमीही देता येणार नाही. भूतकाळात अनेकदा एमआयपी योजनांना पुरेशा नफ्याअभावी लाभांश जाहीर करता आलेला नव्हता. ‘सेबी’च्या नियमानुसार लाभांश केवळ नफ्याच्या रकमेतूनच देता येत असल्याने पुरेसा भांडवली नफा न झाल्याने या योजनांना लाभांश देता आला नाही. म्युच्युअल फंडांच्या योजनांत लाभांश करमुक्त असण्यासाठी समभाग गुंतवणूक किमान ६५ टक्के आवश्यक असते. तसेच समभाग गुंतवणुकीचे प्रमाण ६५ टक्क्यांहून अधिक राखणाऱ्या योजनांना जाहीर केलेल्या लाभांशावर लाभांश वितरण कर (डीडीडी) द्यावा लागत नाही. त्याउलट एमआयपी योजनांतून मिळालेला लाभांश हा कर कार्यक्षम नसतो.  या गोष्टींशी तुलना करता, गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांनंतरचे समभाग गुंतवणूक करणाऱ्या व बॅलेन्स्ड फंडातून एसडब्ल्यूपी पद्धतीने मिळणारे नियमित उत्पन्न खात्रीशीर व करमुक्त असते.

निष्कर्ष : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जितकी दीर्घ मुदतीची, तितकी ती अधिक लाभदायी असते. मोठय़ा कालावधीपर्यंत सुरू राहिलेल्या गुंतवणुकीतून जमा पूंजी एकरकमी न काढता, एसडब्ल्यूपी पद्धतीने गरजेपुरती पद्धतशीरपणे काढल्यास अपेक्षित रकमेसह परतावाही वाढत राहतो. जर गुंतवणूक सुरू केल्यानंतर अल्पावधीतच रक्कम काढायची असल्यास, लिक्विड फंड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म डेट फंडाचा पर्याय निवडून, एसडब्ल्यूपी सुरू करावी. जर निवृत्तीपश्चात नियोजन म्हणून मध्यम ते दीर्घावधीपर्यंत नियमित उत्पन्न हवे असल्यास, हायब्रीड/ बॅलेन्स्ड फंड अथवा दीर्घ मुदतीच्या डेट फंडात गुंतवणूक करून एसडब्ल्यूपी सुरू करावी.

एसडब्ल्यूपी कोणासाठी?

१ जे लोक सेवानिवृत्त झाले आहेत अथवा लवकरच ज्यांना नियमित वेतन मिळणे बंद होईल, त्यांना सेवानिवृत्तीनंतरही मासिक पगारांप्रमाणेच उत्पन्न प्रवाह नियमित राखण्यासाठी आपल्या निवृत्ती लाभ पुंजीचा वापर अशा पद्धतीने करता येईल.

२ घरापासून दूर शिक्षणासाठी गेलेल्या, आपल्या मुलांना दर महिन्याला खात्रीशीर शिक्षण शुल्क, पॉकेट मनी प्रदान करण्यासाठी गुंतवणूकदार या पद्धतीचा वापर करू शकतात.

३ म्युच्युअल फंडाच्या एका योजनेतून काढून घेतलेल्या पैशाची पद्धतशीरपणे दुसऱ्या फंडात पुनर्गुतवणूक करण्यासाठी.

‘स्मार्ट एसडब्ल्यूपी’ एक उदाहरण

समजा, गुंतवणूकदाराने एका म्युच्युअल फंडातील दीर्घावधीपर्यंत सुरू राहिलेल्या गुंतवणुकीतून १०,००० युनिट्स गोळा केले. त्या फंडाचे नक्त मालमत्ता मूल्य (एनएव्ही) हे या समयी २०० रुपये असेल तर त्यांच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य २०,००,००० रुपये होईल. आता त्यांना या गुंतवणुकीतून दरमहा ५०,००० रुपये सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) द्वारे काढायचे आहेत. पहिल्या महिन्यांत त्यांनी ५०,००० रुपये काढले (५०,०००/ २०० एनएव्ही = २५० युनिट्स), तर त्यांचे त्या महिनाअखेर ९,७५० युनिट्स शिल्लक राहतील. प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे या ९,७५० युनिट्सचे गुंतवणूक मूल्य १९,५०,००० रुपये असेल. दुसऱ्या महिन्यांत फंडाचे एनएव्ही वाढून रु. २०४ झाले, तर त्या महिन्यांत काढून घेतलेल्या ५०,००० रुपयांप्रमाणे, (५०,०००/ २०४ एनएव्ही = २४५ युनिट्स), त्यांचे त्या महिनाअखेर ९,५०५ युनिट्स शिल्लक राहतील. तर गुंतवणूक मूल्य हे दुसऱ्या महिनाअखेर १९,३९,०२० रुपये असेल. म्हणजे म्युच्युअल फंडात जमा २० लाखांच्या पूंजीतून दोन महिन्यांत प्रत्येकी ५०,००० रुपये म्हणजे एक लाख रुपये काढूनही त्या गुंतवणूकदाराकडे ३९,०२० रुपये जास्तीची रक्कम उरत असल्याचे दिसून येते. हा जास्तीचा लाभ एसडब्ल्यूपीमुळे शक्य झाला आहे. अर्थात या गृहितकात बाजार चढा आहे, परिणामी एनएव्हीमध्ये वाढ होईल असे मानले गेले आहे. तेजीच्या बाजारात एसडब्ल्यूपी पद्धत अधिक फायदेशीर ठरते.

arthmanas@expressindia.com