म्युचुअल फंडामध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे असले, तरी भारतात सेबी नोंदणीकृत ४०पेक्षा जास्त म्युच्युअल फंड घराणी असून या सर्व फंड घराण्यांच्या एकू ण २००० हून अधिक फंड योजना आहेत. गुंतवणुकीसाठी सुयोग्य योजनेच्या निवडीआधी म्युच्युअल फंडांचे प्रकार आधी समजून घेऊ..

नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करण्यासाठी, म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून निवडताना कोणते महत्त्वाचे घटक विचारात घ्यावयास हवे आणि का हे आता रवींद्रला पूर्णपणे पटलेले दिसले. परंतु म्युचुअल फंडामध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे असले तरी, भारतात सेबी नोंदणीकृत ४० पेक्षा जास्त म्युच्युअल फंड घराणी असून या सर्व फंड घराण्यांच्या एकू ण २००० हून अधिक फंड योजना आहेत. योग्य योजना निवडण्यासाठी म्युच्युअल फंडाचे मूळ किती प्रकार आहेत आणि हे कशावर अवलंबून आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. आपली आर्थिक स्थिती, जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित परतावा यानुसार, योग्य आर्थिक सल्लागाराची मदत घेत यातील मूळ विविध प्रकारांपैकी आपणास योग्य असे प्रकार निवडून त्याप्रमाणे योजना निवडल्यास गुंतवणुकीमागील आर्थिक उद्दिष्टे लवकर पूर्ण होण्यास मदत होते.

म्युच्युअल फंडाचे प्रमुख प्रकार हे मुख्यत: १. संरचना आधारित योजना आणि २. उद्दिष्ट आधारित योजना अशा दोन प्रकारात करता येतील.

संरचना आधारित योजना :

 मुदतबंद (क्लोज-एंडेड) योजना  

* या योजना सर्वसाधारणपणे ३ वर्षे मुदत कालावधीच्या असतात.

* काही योजनांचा कालावधी ३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीचाही असू शकतो.

* मुदतपूर्तीपूर्वी परत गुंतवणूक काढता येत नाही. बहुतांशी योजना या मुदतपूर्तीनंतर ओपन-एंडेड योजनेत परावर्तित होतात.

* काही योजना शेअर बाजारात नोंदविलेल्या आहेत.

* जर योजना बाजारात नोंदवली असेल तेथेच त्यांची खरेदी-विक्री शेअर्सप्रमाणे करता येणे शक्य.

 खुली मुदतमुक्त (ओपन-एंडेड) योजना

* मुदत पूर्तता कालावधी नाही.

* गुंतवणुकीसाठी एका युनिटचे मूल्य (एनएव्ही) या आधारे केव्हाही खरेदी व विक्री करता येणे शक्य.

  इंटरव्हल योजना

* ओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण.

* ठरावीक कालावधीसाठी या योजना विक्री आणि पुनर्खरेदीसाठी खुल्या असतात.

उद्दिष्ट आधारित योजना :

उत्पन्न (इन्कम) योजना

* बाँड्स व कॉर्पोरेट डिबेंचर्ससारख्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूकय

* या योजनांतून परतावे हे स्थिर आणि कमी जोखमीचे.

* भांडवली स्थैर्य हवे असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम.

  वृद्धी (ग्रोथ) योजना 

* या योजना मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ देतात.

* आशादायक परतावा मिळविण्याच्या उद्दिष्टाची पूर्तता.

* मोठा हिस्सा शेअर बाजारात गुंतविला जातो.

* जास्त जोखीम स्वीकारू शकतात, अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय

  बॅलन्स्ड योजना

* सुनिश्चित प्रमाणात शेअर बाजारात व निश्चित उत्पन्न रोख्यांमध्ये गुंतवणूक.

* ग्रोथ व इन्कम योजनेचा सुवर्णमध्य.

* निव्वळ समभागसंलग्न (इक्विटी) योजनांच्या तुलनेत यात कमी जोखीम.

  लिक्विड योजना

* फारच अल्प, थोडय़ा कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर उत्तम योजना.

* अगदी दोन दिवसांसाठीसुद्धा गुंतवणूक केली जाते.

* या योजनेतून मनी मार्केट ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोखे अशा सुरक्षित पर्यायामध्ये गुंतवणूक.

* बँकेतील बचत व चालू खात्याच्या तुलनेत सरस ६ ते ७ टक्के वार्षिक दराने परतावा.

  गिल्ट फंड

* शून्य क्रेडिट जोखीम असणाऱ्या सरकारी रोख्यात गुंतवणूक

* पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक

  करबचत (टॅक्स सेव्हिंग) योजना

* प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८०सी’ अंतर्गत करपात्र उत्पन्नातून वजावटीला प्राप्त.

* कर वजावटीसाठी केली असेल तर गुंतवणूक ३ वर्षे काढता येत नाही.

* कर बचतीसाठी हा उत्तम पर्याय.

* कर बचतीसाठी गुंतवणूक म्हणून विम्याच्या ‘युलिप’ योजनेच्या तुलनेत अधिक योग्य.

 उद्योग क्षेत्रवार (सेक्टर स्पेसिफिक) फंड

* विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. उदा. बँकिंग क्षेत्र अथवा आयटी क्षेत्र.

* फंडातील परतावे हे त्या क्षेत्रातील उद्योगातील कामगिरीवर अवलंबून.

* अशा फंडात जास्त जोखीम असते.

* गुंतवणूकदाराला नियमित लक्ष ठेवावे लागते.

* शेअर बाजारातील व्यवहारात जाणकार असणाऱ्यांनी गुंतवणूक करणे लाभदायक.

  इंडेक्स फंड्स

* समान क्षमतेच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक.

* विशिष्ट निर्देशांकांचा (इंडेक्स) पोर्टफोलिओ अशा योजनेत परावर्तित होतो.

प्रत्येक म्युच्युअल फंड घराणी, फंड व्यवस्थापनासाठी फंड व्यवस्थापक आणि त्यांना साहाय्य करणारी तज्ज्ञ रिसर्च टीम नेमतात, जे सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील होणारे बदल, आर्थिक स्तरावरील चढ-उतार, भावी संभाव्यता, संशोधन व त्यावर अवलंबून नियमितपणे अभ्यास करत असतात. तुलनात्मक अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घेणारे तज्ज्ञ म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात आणि हे सर्व आपण एकटय़ाने करणे कठीण होते. हे लक्षात आल्यावर रवींद्रला कळून चुकले की, ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करीत असले तरीही म्युच्युअल फंडाचे नियमित गुंतवणूकदार (दीर्घ मुदतीसाठी) होणे का पसंत करतात.

arthasanvad@gmail.com