अर्धा डझन कच्चे लिंबू!   भाग – ७

आज निकालाचा दिवस! दहावी, बारावी किंवा पदवीचा नाही, तर आपल्या अर्धा डझन कच्च्या लिंबांचा. गेले सहा महिने जे शिकत होते त्याचं प्रत्यंतर आज त्यांच्या स्वत:च्या पोर्टफोलियोमध्ये झालं होतं. जरा बाचकत, जरा घाबरत का होईना, सगळ्यांनी हिंमत केली होती. सोनल काय अभिप्राय देते याबद्दल सर्वाच्या मनात खूप उत्सुकता होती. त्यामुळे आज सगळ्या जणी काहीही करून नेहमीच्या ट्रेनमध्ये चढल्या. ठाणे स्टेशन आलं तसं सोनल आणि सुगंधाताई ट्रेनमध्ये घुसल्या. सोनलने सर्वाच्या चेहेऱ्यावरून नजर फिरवली आणि तिला छान हसूच आलं. हसता हसता म्हणाली- ‘‘अगं बाई, काय टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही सगळ्या! तुमचाच दहावी-बारावीचा निकाल असल्यासारख्या..’’ तिच्या या म्हणण्यावर सगळ्या जणी खुदकन हसल्या. जिग्ना म्हणाली- ‘सोनलदीदी, अहो परीक्षाच होती की आमची. किती मेहेनत करायला लागली.’ तिलोत्तमा तिला जोड देत म्हणाली- ‘गुंतवणूक विचार करून करणं हे शिस्तीचं आणि चिकाटीचं काम आहे बाबा. बऱ्याच वेळा अर्धवट सोडून द्यायचा विचार मनात येतो. पण प्रत्येक वेळेला तू सांगितलेल्या गोष्टी आठवून पुन्हा नवीन उमेदीने काम केलं.’ मग जरा घाबरत मीनाक्षी म्हणाली- ‘सोनल आक्का, एक सांगते. आम्ही थोडी चीटिंग पण केली.’ त्यावर यास्मिनने तिच्याकडे डोळे वटारून पाहिले. सोनलला आश्चर्य वाटलं. म्हणाली- चीटिंग? आता यात काय चीटिंग केली तुम्ही? सिल्वी म्हणाली – मी सांगते. आम्ही सगळ्या जणींनी दोन शनिवार बसून सगळं काम एकत्र केलं. म्हणजे आम्हा सर्वाचे पोर्टफोलियो बनवले. एक-एकटीने डोकं न लढवता, सगळ्यांनी मिळून काम केलं आहे. त्यामुळे असं झालं की आमचे बरेचसे प्रश्न आपसात चर्चा करून सुटले. सोनल म्हणाली – अरे यात कसली आली चीटिंग? हे तर बरंच झालं. खरं सांगायचं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सगळ्याच गोष्टींची माहिती नसते. आणि जेव्हा आपण चार सुज्ञ लोकांमध्ये चर्चा करतो तेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं. त्यावर यास्मिन म्हणाली- चला बरं झालं. आम्हाला आपलं उगीच अपराधी वाटत होतं. पण एक अजून गोष्ट आहे. आम्ही म्युचुअल फंड निवडताना वेगवेगळ्या वर्तमानपत्रात मिळणारी माहिती वाचली आणि त्यातून आम्हाला समजतील असे फंड निवडले. कुणा तज्ज्ञ व्यक्तीने वर्तमानपत्रात एखादा फंड सुचविला म्हणून आम्ही त्या फंडाकडे वळलो. पण या पुढे स्वत: फंड कसा तपासायचा हे पण आम्हाला शिकायचंय. सोनलने शांतपणे हे सर्व ऐकून घेतलं आणि तिला या सर्वाचं खूप कौतुक करावंसं वाटलं. ती म्हणाली – गुंतवणुकीची सुरुवात अशीच होते आणि जसजशा गोष्टी अंगवळणी पडतात तस तसं आपण त्याच्यात मुरत जातो. आधी आपण कुणी तरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवतो आणि हळूहळू स्वत: एखाद्याचं म्हणणं आपल्यासाठी बरोबर आहे की नाही हे तपासायला शिकतो. मला आनंद आहे की तुम्ही हे सगळं केलं आहे. चला आता मला दाखवा बरं काय शिजवलंय ते!

promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
softbank sells another 2 percent stake in paytm for rs 950 crore
पेटीएमने UPI व्यवहार करता? रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाचा निर्णय, नवी अपडेट काय?
Emphasis on use of processed water decision of Navi Mumbai Municipal Corporation
प्रक्रियायुक्त पाणी वापरावर भर, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

(सोबतचा तक्ता पाहावा)

हे सगळं वाचल्यावर सोनलने मान वर केली आणि म्हणाली – अरे वाह वाह! छान काम केलंत तुम्ही सर्वानी. जमलं बुवा तुम्हाला बऱ्यापैकी. फंड पण अगदी चांगले निवडलेत. व्हेरी गुड! पण एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक मोठी चूक आहे! सगळे लिंबू तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. काही केल्या त्यांच्या लक्षात येईना की आपण कुठे चुकलो आहोत. शेवटी न राहवून सोनल म्हणाली : तुम्ही पोर्टफोलिओ बनवताना फक्त म्युचुअल फंड हाच गुंतवणूक पर्याय निवडलात. बाकी पर्यायांचं काय : सोने, कंपनी एफडी, स्थावर मालमत्ता, पीपीएफ? कधीही पोर्टफोलिओ बनवताना ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की आपले सगळे पैसे जास्त जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीत तर नाही ना. कारण शेअर बाजाराशी निगडित असलेले म्युचुअल फंड हे बाजारामधल्या चढ-उताराबरोबर वर-खाली होत असतात. शिवाय प्रत्येक गुंतवणुकीचं एक चक्र असतं. एखादी गुंतवणूक जेव्हा निगेटिव्ह परतावे देत असते तेव्हा दुसरी कुठली तरी वाढून परतावे देत असते. म्हणून एकाच प्रकारच्या गुंतवणुकीवर अवलंबून राहायचं नाही. कळलं का? सगळ्या जणी एका सुरात हो म्हणाल्या.

सोनल इथेच थांबली नाही. म्हणाली : म्युचुअल फंडाची माहिती काढताना काही गोष्टी तपासायला हव्यात.

या गोष्टी नक्की तपासाव्यात:

*  फंड किती मोठा आहे हे तपासावं. अगदी छोटे फंड टाळावेत.

* फंडाचा खर्च किती टक्के आहे हे बघून घ्यावं. रेग्युलर प्लान हा डायरेक्ट प्लानपेक्षा खर्चीक असतो. परंतु जर आपल्याला नेटवरचे व्यवहार कळत नसतील तर म्युचुअल फंड डिस्ट्रिब्युटरकडून रेग्युलर प्लानमध्ये गुंतवणूक करावी.

* गुंतवणूक करण्यापूर्वी एक्झिट लोड समजून घ्यावा. लिक्विड फंडातून पैसे काढताना एक्झिट लोड लागत नाही.

*  फंडाचे परतावे हे दीर्घकाळावर तपासावे. फक्त एक वर्षांचे परतावे बघून निर्णय घेऊ नये.

* फंडाची जोखीम तपासून घ्यावी : प्रत्येक फंडाचा बीटा नेटवर दाखवण्यात येतो. १ पेक्षा जास्त बीटा असणारा फंड जास्त जोखमीचा असतो आणि कमी जोखीम असणाऱ्या फंडाचा बीटा १ पेक्षा कमी असतो.

*  कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना त्यावर कर कधी आणि किती लागतो हे जाणून घ्यावं. त्यानुसार गुंतवणूक करून, कर आणि परताव्याचे समीकरण सांभाळावे.

*  एका पोर्टफोलिओमध्ये ५-६ फंड पुरे.

* केलेली गुंतवणूक व्यवस्थित परतावे देत आहे की नाही हे वेळोवेळी तपासून घ्यावं. जर परतावे कमी होत असताना दिसले तर त्या मागचं कारण शोधून मग पुढे गुंतवणूक चालू ठेवायची की बदलायची हा निर्णय घ्यावा.

arth02

arth03

एवढं सांगून सोनल थांबली. तिला मनापासून खूप आनंद वाटत होता की आज हे अर्धा डझन कच्चे लिंबू पिकले होते. सगळ्या जणी खुश होत्या. जिग्ना म्हणाली : सोनलदीदी! आज तुझ्यामुळे आम्हाला गुंतवणुकीबद्दल आत्मविश्वास वाटायला लागला. यास्मिनने तिला जोड दिली – हो सोनल, तू इतका वेळ आम्हाला दिलास आणि आम्हाला खूप समजून घेतलस त्याबद्दल खूप खूप आभार. मीनाक्षी म्हणाली – सोनल आक्का, माझ्या गुंतवणुकीच्या प्रवासाची शुभ सुरुवात तुझ्या हातून झाली हे माझं भाग्य आहे. तिलोत्तमा म्हणाली – मीनाक्षीला अगदी योग्य वेळेला तुझं मार्गदर्शन मिळालं. आम्हाला थोडा उशीर झाला, पण देर आये दुरुस्त आये! अजूनही वेळ गेलेली नाही. सिल्वी सोनलला एक गिफ्ट देत म्हणाली- सोनल, आजवर तू जे काही ज्ञान आम्हाला दिलंस त्याची कुठेच किंमत नाही होऊ  शकणार. आमची आठवण तुला राहावी म्हणून एक छोटीशी भेट आम्हा लिंबांकडून. सर्वात शेवटी सुगंधा ताई म्हणाल्या – या वर्षीचं एक धोरण तर पार पाडलं आपण सर्वानी. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की सोनलने वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सर्वानी तितक्याच उत्साहाने तिच्याकडून सर्व समजून घेतलं. एक मात्र आपण सर्वानी आता केलं पाहिजे ते म्हणजे नियमितपणे सोनलबरोबर संपर्कात राहू या. काय सोनल, बरोबर ना? सोनल त्यावर म्हणाली – हो हो, अगदी बरोबर. चला, आता तुम्हाला सगळं कळलेलं आहे, तर माझं काम झालं. आता यापुढच्या प्रवासासाठी तुम्हा सर्वाना शुभेच्छा. कधीही काहीही लागलं तर मला नक्की फोन करा. नवनवीन गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती मिळवत राहा. तुम्हा सर्वाची खूप प्रगती होवो. आता माझा स्टेशन आलं, मी येते. असं म्हणून सोनल ट्रेनमधून उतरली. सगळे पक्के लिंबू आता नव्या उमेदीने नवीन प्रवासाकडे वाटचाल करायला तयार झाले होते.

टीप: वरील नमूद नावांचा कुणाही व्यक्तीशी – जीवित अथवा मृत, संबंध नाही. या व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि आर्थिक नियोजनाच्या कथेत फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून भूमिका साकारत आहेत. या लेखामध्ये उद्धृत म्युच्युअल फंड हे फक्त उदाहरणापुरते मर्यादित आहेत. वाचकांनी गुंतवणूक करताना स्वत: पूर्ण माहिती मिळवून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

तृप्ती राणे trupti_vrane@yahoo.com