एक हजारहून अधिक चित्रपट, तीन लाख दहा हजारहून अधिक छायाचित्रे इतक्या मोठय़ा प्रमाणात माहिती साठवून ठेवणारा एक ड्राइव्ह मायक्रोसॉफ्टने आपल्या नव्या लुमिया फोनसोबत देऊ केला आहे. यामुळे क्लाऊड स्टोअरेज सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी दिशा मिळणार असून एवढय़ा मोठय़ा सुविधेमुळे छोटय़ा उद्योगांना भविष्यात माहिती साठवण्यासाठी वेगळी गुंतवणूक करण्याची गरज भासणार नसल्याचा विश्वास कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी मायक्रोसॉफ्टने लुमिया ८३०, ७३० आणि ९३० या तीन फोनचे अनावरण केले, त्या वेळेस ही माहिती दिली.
 यापूर्वीच्या फोन्समध्ये १५ जीबीपर्यंतची ड्राइव्ह स्टोअरेजची सुविधा मोफत दिली जात होती; पण आता या नवीन फोनमध्ये एक टेराबाइटची ड्राइव्ह स्टोअरेज सुविधा सहा महिन्यांसाठी मोफत दिली जाणार असून त्यानंतर दरमाह १२५ रुपये आकारले जाईल, अशी माहिती नोकिया इंडियाचे विपणन ँप्रमुख रघुवेश स्वरूप यांनी दिली.
लुमिया ८३० या फोनमध्ये प्युअर व्ह्य़ू इमेजिंग सुविधा देण्यात आली आहे. याला १० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये फोटो टिपताना फोटो टिपण्यापूर्वीच्या हालचालींचा छोटेखानी व्हिडीओही सेव्ह होतो. यामुळे यातील फोटो एमपी४ फॉर्मटमध्ये सेव्ह होतात. हा फोन ८ ऑक्टोबर रोजी बाजारात येणार असून याची किंमत २८,७९९ रुपये इतकी आहे.
लुमिया ७३० डय़ुएल सिम हा फोन स्काइप आणि सेल्फिजसाठी उपयुक्त असून यामध्ये फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेल वाइड अँगलचा देण्यात आला आहे. यामुळे यामध्ये फ्रंट कॅमेराने फोटो काढताना किमान १५ जणांचा फोटो सहज काढता येऊ शकतो. या फोनचा मुख्य कॅमेरा हा ६.७ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन ६ ऑक्टोबर रोजी बाजारात येणार असून याची किंमत १५,२९९ रुपये इतकी आहे.
लुमिया ९३० या फोनमध्ये २० मेगापिक्सेलचा प्युअर व्ह्य़ू कॅमेरा देण्यात आला आहे. यात २.२ गीगाहार्टझचा स्नॅपडेगन क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अधिकाधिक अ‍ॅप्स वापरणे, गेम्स खेळणे आणि इंटरनेट वापरण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हा फोन १५ ऑक्टोबर रोजी बाजारात येणार असून याची किंमत ६८,६४९ रुपये इतकी आहे. या सर्व फोनमध्ये एक टेराबाइटची वन ड्राइव्ह स्टोअरेज जागा सहा महिन्यांसाठी मोफत देण्यात आली आहे.
मायक्रोसॉफ्टने आपल्या नोकिया लुमिया मालिकेत आणखी तीन फोन बुधवारी मुंबईत दाखल केले.  नोकिया इंडियाचे विक्री-विपणन प्रमुख रघुवेश स्वरूप यांनी त्यांचे अनावरण केले. विंडोज फोनच्या व्यासपीठावर बाजारात येत असलेल्या फोन्समध्ये मायक्रोसॉफ्टच्या ऑफिससह विविध सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये स्काइप याचबरोबर ड्राइव्ह स्टोअरेजची सुविधाही देण्यात आली आहे. यातील लुमिया ७३० हा फोन परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.