भारतीय दुचाकी बाजारपेठेत दुहेरी आकडय़ातील हिस्सा राखणाऱ्या मुळच्या जपानच्या होन्डा कंपनीने नव्या वर्षांत १० वाहने सादर करण्याचे घोषित केले आहे.
कंपनीच्या नव्या सीबी यूनिकॉन १६० मोटरसायकलचे अनावरण गुरुवारी नवी दिल्लीत झाले. यावेळी होन्डा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर्स इंडियाचे अध्यक्ष केईता मुरामात्सु यांनीह हा मनोदय व्यक्त केला.
कंपनीच्या ताफ्यात तूर्त विविध २० दुचाकी आहेत. यामध्ये मोटरसायकल व गिअरलेस स्कूटरचा समावेश आहे. भारतीय दुचाकी विक्रीत कंपनीचा बाजारहिस्सा २० टक्क्य़ांहून अधिक आहे.
जानेवारीपासून उपलब्ध होणाऱ्या नव्या यूनिकॉर्नची किंमत ६९,३५० रुपयांपासून पुढे आहे. नवी सीबी यूनिकॉन १६० ही या इम्पेरियल रेड मेटॅलिक, पर्ल ब्लॅक, जेनी ग्रे मेटॅलिक आणि समबीम व्हाइट चार विविध रंगात व स्टँडर्ड व सीबीएस या दोन प्रकारात उपलब्ध आहे. चालू वर्षांत सादर केलेली नवी दुचाकी ही कंपनीची चौथी आहे. या दरम्यान एक्टिव्हा १२५ (स्कूटर), सीडी ११० आणि गोल्ड विंग (मोटरसायकल) या दुचाकी सादर  केल्या. याचबरोबर कंपनीने १५० सीसी ते १८० सीसी मोटारसायकलींचा आपला फोर्टफोलिओ विस्तारित केला. कंपनीने या वर्षांत दोन कोटी वाहन विक्रीचा टप्पाही पार केला.