भारतीय अर्थव्यवस्थेला १० टक्के वाढीचा दर गाठणे अवघड नाही, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक सुधारणा व धोरणात्मक बदल तसेच चांगला मान्सून या तीन घटकांच्या आधारे आपण हा आशावाद व्यक्त करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आखलेल्या दौऱ्यात त्यांनी सांगितले की, दहा टक्के आर्थिक विकास दर गाठण्याची आमची क्षमता आहे. वाईट मान्सून, मार्चमध्ये झालेले पिकांचे नुकसान, उत्पादन क्षेत्रातील पीछेहाट या स्थितीतही भारताने सात टक्के विकास दर गाठला. आता पायाभूत सुविधांमध्ये पैसा गुंतवला जात आहे. आर्थिक धोरणात बदल केले जात आहेत, त्यामुळे उत्पादन क्षेत्रातही बदल अपेक्षित आहेत. वस्तू व सेवा करामुळे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात १ टक्का भर पडणार आहे.
गेल्या वर्षी देशाचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के होता. हे लक्ष्य गाठले असले तरी ते किमान दोन वर्षे टिकवणे हे खरे आव्हान आहे. अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिटय़ूट या संस्थेत ते बोलत होते.
‘हे तर आव्हान’
भूमिअधिग्रहण विधेयक हे मोठे आव्हान आहे, त्याचे फायदे ग्रामीण विकासासाठी आहेत हे लोकांना समजून सांगावे लागेल. मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे पुढील वर्षी भारताच्या उत्पादन क्षेत्रातही सुधारणा होईल. दिवाळखोरी न्यायालय, उद्योगासाठी कमीत कमी परवाने, औद्योगिक कलहासाठी झटपट निकाल या उपाययोजना विचाराधीन आहेत. एकेकाळी आर्थिक तूट ६ टक्के होती ती आम्ही चार टक्के इतकी खाली आणली आहे. चालू खात्यावरील तूट ही गेल्या तिमाहीत ०.२ होती. भांडवल निर्मिती वाढली आहे. पायाभूत सुविधांत प्रगती सुरू होत असल्याचा दावा त्यांनी केला.