गुंतवणूकदारांकडून ६२ कोटींचा निधी उभारला जाणार!

गुंतवणूकदारांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादातून उत्साहित होऊन, लघू व मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्रातील ११ प्रथितयश कंपन्या येत्या शुक्रवारी (३० सप्टेंबरला) भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा कल अजमावणार आहेत. यातील सात भागविक्री या ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी, तर चार कंपन्यांची भागविक्री बीएसई एसएमई बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी आहे.

या प्रस्तावित भागविक्रीचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय़ म्हणजे हेम सिक्युरिटीज या एकाच र्मचट बँकरकडून त्यापैकी पाच भागविक्रींचे व्यवस्थापन पाहिले जात आहे. एनएसई इमर्जवरील सातपैकी पाच कंपन्यांचा भागविक्रीचा प्रस्ताव हेम सिक्युरिटीजकडून दाखल झाला आहे. त्याच वेळी पँटोमाथ कॅपिटल या दुसऱ्या एका प्रथितयश र्मचट बँकर संस्थेमार्फत ३० सप्टेंबरपासूनच दोन्ही बाजारमंचांवर सात कंपन्यांच्या भागविक्री सुरू होत आहेत. देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासात साधली गेलेली ही अतुलनीय कामगिरी आहे. या ११ कंपन्यांकडून समभागांच्या विक्रीतून एकूण ६१.८५ कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

हेम सिक्युरिटीजकडून भागविक्रीसाठी प्रस्ताव दाखल झालेल्या पाच कंपन्या गुंतवणूकदारांकडून ३२.२९ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. एसएमई भागविक्रीच्या क्षेत्रातील या असामान्य कामगिरी आपल्यासाठी खूपच अभिमानास्पद असल्याचे हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनी सांगितले. कंपनीने चालू वर्षांत एकंदर ३२ भागविक्रींसाठी प्रस्ताव दाखल केले असून, गेल्या आठवडय़ातही एकाच दिवशी दोन कंपन्यांच्या एनएसई इमर्ज बाजारात यशस्वी सूचिबद्धता करण्यात तिचे योगदान राहिले. नुकत्याच सूचिबद्ध झालेल्या मध्य भारत अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स लि.ने जवळपास साडेसात पटीने भरणा करणारा प्रतिसाद मिळवून १०३ कोटी रुपये उभारले, अशी जैन यांनी माहिती दिली.

 ‘एनएसई इमर्जवरील सूचिबद्ध कंपन्यांचे अर्धशतक!

  • चालू आर्थिक वर्षांत पहिल्या सहा महिन्यांत २९ छोटय़ा कंपन्या एसएमई बाजारमंचावर सूचिबद्ध झाल्या असून, त्यांनी २३४.७३ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवणूकदारांकडून उभारले आहे. एसएमई बाजारमंचाच्या परिपक्वतेचे हे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईचे समूह प्रमुख इक्विटी (एसएमई) रवी वाराणसी यांनी व्यक्त केली. पँटोमाथ, हेम सिक्युरिटीजसारख्या संस्थांकडून छोटय़ा उद्योगक्षेत्रात सुरू असलेली जागृती मोहीम आणि या पर्यायी भांडवली स्रोताबाबत कंपन्यांनी दाखविलेल्या सजगतेतून हे घडत आहे. एकाच वेळी पाचहून अधिक कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडे निधीसाठी धाव घेणे अभूतपूर्व गोष्टच असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याभरात एनएसईकडे दाखल सहा कंपन्यांचे प्रस्तावांना भागविक्रीसाठी विचारात घेतले जाईल. तसे झाल्यास ऑक्टोबरअखेर एनएसई इमर्जवर कंपन्यांची संख्या अर्धशतक गाठेल. गत आर्थिक वर्षांत एकूण ४४ एसएमई कंपन्यांनी २९० कोटी रुपये उभारून बाजारात सूचिबद्धता मिळविली आहे.

पँटोमाथकडून रौप्य साजरे

  • चालू आठवडय़ातील कंपन्यांच्या प्रस्तावित भागविक्रीपश्चात, एसएमई मंचावर पँटोमाथ कॅपिटलकडून सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्या २५ चा आकडा गाठतील. या क्षेत्रातील अशी कामगिरी करणारी पँटोमाथ पहिलीच र्मचट बँकर आहे, असे तिचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत यांनी दावा केला. चालू आठवडय़ात पँटोमाथमार्फत भागविक्री करणाऱ्या कंपन्या ३२.२७ कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभारतील. आगामी दोन महिन्यांत आणखी ११ कंपन्यांच्या भागविक्रीसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केले गेले आहेत, अशी लुनावत यांनी माहिती दिली.