चिनी कंपनीची सणांवर मदार; १० टक्के बाजारपेठेचे उद्दीष्टय़

येत्या महिन्यातील गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या सण समारंभावर चिनी मोबाइल संच निर्माती जिओनीची भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेवर नजर असून केवळ या कालावधीत २०० कोटी रुपये खर्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे.

कंपनीने चालू वर्षांसाठी एकूण ६०० कोटी रुपयांच्या खर्चाचे गणित मांडले आहे. पैकी २०० कोटी रुपये यंदाच्या सणांच्या हंगामात तर ४०० कोटी रुपये हे उर्वरित कालावधीत खर्च केले जाणार आहे. येणारा सणांचा कालावधी लक्षात घेता कंपनीने याबाबत येत्या काही महिन्यांमध्ये विक्री धोरणावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले असल्याचे जिओनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद वोहरा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

वोहरा यांनी एस६एस हा १७,९९९ रुपये किमतीचा ५.५ इंच स्क्रीन असलेला स्मार्टफोन सोमवारी नवी दिल्ली येथे सादर केला. ऑक्टोबरच्या मध्यात कंपनी चार नवे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्याच्या तयारीत आहे. ९,९९९ ते २४,९९९ रुपये दरम्यानचे हे फोन असतील. कंपनीने अभिनेत्री अलिया भटला सदिच्छादूत म्हणून आपल्या उत्पादनांसाठी नियुक्त केले आहे. भारतीय व्यवसाय विस्तारादरम्यान आणखी एक सदिच्छादूत करारबद्ध होईल, अशी माहिती कंपनीने दिली.

मार्च २०१७ पर्यंत येथील ७ ते १० टक्के बाजारहिस्सा काबीज करण्याचा कंपनीचा मनोदय आहे. सध्या तो ५ टक्के आहे. कंपनीच्या फोनची येथे महिन्याला ५ लाख विक्री होते.

कंपनी तयार करत असलेल्या एकूण फोनपैकी ६० टक्के फोन हे भारतात तयार करते.