देशाचा अर्थसंकल्प हा एक फार मोठा सोहळा असतो. देशाच्या वार्षिक जमा-खर्चाचे हे अंदाजपत्रक खरे तर तारेवरची कसरतच असते. यंदाचा अर्थसंकल्प तर मोदी सरकारचा मधुचंद्राचा काळ संपल्यानंतरचा पहिला संपूर्ण संकल्प आहे. तर हा दस्तऐवज तयार करण्यामागे परिश्रम घेणाऱ्या अर्थमंडळातील अनेकांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थमंडळात कोण कोण आहेत त्यांचा हा परिचय..

अर्थमंत्री अरुण जेटली आणि अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा हे ११ जणांच्या संघाचे अनुक्रमे कप्तान आणि उपकप्तानच.

अरविंद सुब्रह्मण्यम
सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार या नात्याने अर्थसंकल्पीय दस्तऐवजाची मांडणी यांनीच करावयाची आहे. अतिशय नावाजलेले अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतही त्यांनी काम केले आहे. ते चांगले वक्ते आहे व लेखक आहेत. त्यांचे नाणे या अर्थसंकल्पात खणकून वाजणार अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

शक्तिकांता दास
अर्थमंत्रालयातील महसूल खात्याचे हे सचिव आहेत. महसूल म्हणजे सरकारचा जीव की प्राण असतो. कारण त्याशिवाय पान हलत नाही. त्यामुळे महसूल जास्त प्रमाणात मिळवण्याची करामत त्यांना करावी लागेल. व्यापार व उद्योग मंत्रालयाच्या समन्वयातून महसूल उभा करण्याचा प्रयत्न ते करतील
रतन पी. वट्टल
हे खर्च खात्याचे सचिव असून, अर्थसंकल्पात खर्च किती करायचा हे ते बघतील. अर्थमंत्री जेटली यांना सार्वजनिक खर्चासाठी पैसे शिल्लक ठेवणे हे त्यांच्यासमोरचे आव्हान आहे.

आराधना जोहरी
या र्निगुतवणूक खात्याच्या सचिव असून त्यांनी उत्तर प्रदेशात सनदी अधिकारी म्हणून ३२ वर्षे काम केले आहे. आर्थिक सुधारणांमध्ये र्निगुतवणूक फार महत्त्वाची असते, त्यामुळे आता त्या किती कडक धोरण स्वीकारतात ते पाहायचे.

राजीव महर्षी
हे अर्थ सचिव तर आहेत पण आर्थिक कामकाज खात्याचेही सचिव आहेत. अतिशय अनुभवी असलेले हे अधिकारी असून त्यांनी खर्च, महसूल, वित्तीय सेवा, र्निगुतवणूक हे विभाग यापूर्वी सांभाळले आहेत.राजस्थान केडरचे सनदी अधिकारी असून निर्णय घेणे व अमलात आणणे याची त्यांची हातोटी वेगळी आहे.

हसमुख अधिया
हे वित्तीयसेवा खात्याचे सचिव असून ते गुजरात केडरचे सनदी अधिकारी आहेत. नोव्हेंबरमध्ये त्यांची या विभागात नेमणूक झाली. यापूर्वी त्यांनी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात सरकारमध्ये अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, शिक्षण खात्याचे मुख्य सचिव, उद्योग खात्याचे संचालक, गुजरात औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशी अनेक पदे भूषवली आहेत.

अनिता कपूर
प्रत्यक्ष करमंडळाच्या अध्यक्षा असून त्यांची नेमणूक ही नोव्हेंबरमध्येच झाली. १९७८ मध्ये त्या महसूल सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. प्रत्यक्ष कराचे अर्थसंकल्पातील धोरण ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

कौशल श्रीवास्तव
हे अबकरी व सीमा शुल्क विभागाचे अध्यक्ष असून अनुभवी अधिकारी आहेत. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी त्यांना युक्त्या कराव्या लागतील.

रजत भार्गव – अर्थसंकल्प सहसचिव असून चिदंबरम यांच्या अर्थसंकल्प चमूतही हे होते. अर्थसंकल्पाच्या पूर्व तयारीत शेवटचे सात दिवस डोळ्यात तेल घालून काम करण्याची जबाबदारी असते. ते भूतांत्रिक अभियांत्रिकीत पीएच.डी. असून एमबीए व एलएलबी आहेत.