आगामी कालावधीत अधिक कडक होणाऱ्या पर्यावरण तसेच सुरक्षेबाबतची बंधने वाहनांच्या सुटे भाग निर्मिती क्षेत्राच्या पथ्यावर पडणार असून हा उद्योग २०२१ पर्यंत ११५ अब्ज डॉलरच्या घरात जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुटे भाग निर्मिती क्षेत्रासाठी भारत हा आशियातील भांडार होण्याच्या दिशने प्रवास करीत असल्याचाही आशावाद व्यक्त आला आहे.
वित्त उत्पादने आणि सेवा क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या एडेलवाइज फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसने वाहन क्षेत्राशी संबंधित सुटे भाग व्यवसायाच्या आगामी प्रवासाचे वर्णन करणारा अहवाल प्रकाशित केला आहे. देशातील २० हून अधिक सुटे भाग निर्मात्यांच्या जाणून घेतलेल्या मतांवर आधारित या अहवालातून या उद्योगाच्या उत्पादन, विक्री तसेच निर्यातीचे वाढीव उद्दिष्ट समोर आले आहे.
भारतातील वाहनांचा सुटे भाग निर्मिती उद्योग हा सध्या ३८ अब्ज डॉलरचा असून तो १७ टक्क्यांनी वार्षिक प्रगती नोंदवीत आहे. २०२१ पर्यंत हा उद्योग २६ टक्क्यांनी उंचावून ११५ अब्ज डॉलपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर जागतिक निर्यात क्षेत्रात ७ अब्ज डॉलरचा हिस्सा राखणारे हे क्षेत्र २०२१ पर्यंत ३० अब्ज डॉलरचे होईल, असेही याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एडेलवाइजच्या संशोधन विभागाचे प्रमुख विनय खट्टर यांनी सांगितले की, पर्यावरणाबाबत भारत/युरो दर्जा अद्ययावतता तसेच सुरक्षेच्या दृष्टीने एअरबॅग्जची सक्ती, त्याचबरोबर बदलत्या जीवनशैलीपोटी येणाऱ्या वाय-फायसारख्या अद्ययावत यंत्रणा यामुळे एकूणच वाहनांशी संबंधित सुटे भाग व्यवसायाला आगामी कालावधीत मोठय़ा विस्ताराची संधी आहे. सुटे भाग क्षेत्रातील कंपनी ताबा आणि वाहनांसाठी केवळ युरोपवर नसलेले अवलंबित्व हेदेखील या उद्योगासाठी पूरक ठरणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचाही लाभ भविष्यकाळात हे क्षेत्र घेताना दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

आशियाच्या भांडाराच्या दिशेने प्रवास!
एडेलवाइजने सर्वेक्षण केलेले २० आघाडीचे सुटे भाग उत्पादक हे जागतिक बाजारामध्ये ६४ टक्के हिस्सा राखतात. यामध्ये मदरसन सुमी सिस्टीम्स, बॉश, सुप्राजित इंजिनीअिरग, अपोलो टायर्स, भारत फोर्ज, एमआरएफ, वाब्को इंडिया, टय़ूब इन्व्हेस्टमेन्ट, अमर राजा बॅटरीज, अ‍ॅम्टेक ऑटो यांचा समावेश आहे.