वाढत्या दरांमुळे देशाच्या आर्थिक महानगरातील निवासी जागांची विक्री २०१४च्या दुसऱ्या अर्धवार्षिकात तब्बल २८ टक्क्यांनी रोडावली आहे, तर नवे प्रकल्पही आधीच्या वर्षांच्या तुलनेत १७ टक्क्यांनी कमी झाले आहेत.
गेल्या वर्षांत व्यापारी जागांसाठीचे बांधकाम अवघ्या ६ टक्क्यांनी घसरले असले तरी जुलै ते डिसेंबर २०१४ मध्ये या प्रकारच्या जागांची विक्री मात्र १४ टक्क्यांनी वाढली आहे.
देशातील सहा मोठय़ा शहरांमधील स्थावर मालमत्ता क्षेत्राचा २०१४ मधील दुसऱ्या टप्प्यातील प्रवास या क्षेत्रातील सल्लागार कंपनी ‘नाईट फ्रॅन्क’ने बुधवारी सादर केला. यामध्ये ही बाब अधोरेखित झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत घरांच्या किमती नेमक्या किती वाढल्या हे स्पष्टपणे न देता आगामी कालावधीत किमती स्थिर होण्यासह विक्री वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सर्वेक्षण करण्यात आलेल्या सहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई व पुणे शहरांचा समावेश आहे. देशाच्या राजधानी नवी दिल्ली व परिसरातील घरविक्री तब्बल ४३ टक्क्यांनी कमी झाली आहे. सर्व सहा शहरांमध्ये हा नकारात्मक कल दिसून आला आहे. त्यातही मुंबई आघाडीवर आहे, तर दिल्लीने गेल्या दशकातील सर्वात सुमार प्रवास २०१४ मध्ये नोंदविला आहे.
जुलै ते डिसेंबर २०१४ मध्ये एकूण २,३४,९३० जागांची विक्री झाली आहे. आधीच्या वर्षांत ती २,८४,५५० होती. २०१३ व २०१४ मधील उर्वरित सहा महिन्यांमधील नव्या प्रकल्पांची संख्या अनुक्रमे ३,७२,१६० व २,६८,९५० होती. २०१५ मध्ये जागांच्या किमतीत सुधार दिसून येईल व त्या जोरावर विक्री व नवे प्रकल्पही वाढतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.

कमी मागणीमुळे यंदा घरांची विक्री घसरली आहे, तर माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्राकडून आलेल्या मागणीमुळे व्यापारी जागांना मागणी वाढती राहिली आहे. व्यापारी जागांबाबत सर्व सहा प्रमुख शहरांमध्ये हे चित्र दिसले आहे.
’ सामंतक दास, मुख्य अर्थतज्ज्ञ व संशोधन संचालक, नाईट फ्रॅँक