वस्त्रनिर्मात्या संघटनेचा चीनशी सामंजस्य करार

वस्त्र आणि तयार कपडय़ांच्या क्षेत्रात भारत आणि चीन दरम्यान सामंजस्य करारावर, वस्त्रनिर्मात्यांची संघटना सीएमएआय तसेच इंटरनॅशल अ‍ॅपरल फेडरेशनचे अध्यक्ष राहुल मेहता आणि चायना चेंबर ऑफ कॉमर्स (सीसीसीटी)चे जियांग हुई यांच्याकडून उभयपक्षी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय तयार वस्त्र निर्मात्या महासंघाकडून आशियात पहिल्यांदाच म्हणजे मुंबईत आयोजित दोन दिवसांच्या परिसंवादाची हा सामंजस्य करार एक मोठी फलश्रुती ठरली आहे.

चीनने जास्त मनुष्यबळावर आधारित उद्योगांवरील मदार कमी केली असून, यात वस्त्रोद्योग आणि तयार वस्त्रनिर्मिती क्षेत्राचा समावेश आहे. चीनच्या जाण्याने या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी ही भारतीय वस्त्रोद्योगासाठी मोठी सुसंधी आहे, असे या प्रसंगी बोलताना राहुल मेहता म्हणाले. हा करार त्या दिशेने पडलेले मोठे पाऊल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी मफतलाल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी अनिरुद्ध देशमुख हेही उपस्थित होते. महानगरांव्यतिरिक्त दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या वस्त्र विक्रेत्यांना (रिटेलर्स) मोठय़ा संधी खुणावत असून, फ्रँचाइजी तत्त्वावर या क्षेत्रातच आगामी विस्ताराच्या संधी अजमावून पाहिल्या जातील, असे सांगितले.

तयार वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (एईपीसी)चे अध्यक्ष अशोक राजानी यांनी पुढील तीन वर्षांमध्ये देशातील तयार वस्त्रांची निर्यात उलाढाल ३० अब्ज अमेरिकी डॉलरचे लक्ष्य गाठेल, असा कयास व्यक्त केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना, उद्योगांकडून ११ अब्ज डॉलरची गुंतवणूकही होईल, असा अंदाज त्यांनी वर्तविला.