गत वर्षभरात अनेक भारतीय औषधी निर्मात्यांना अमेरिकेच्या औषध नियामकांच्या कडव्या कारवायांना तोंड द्यावे लागले असले तरी, आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये भारतीय कंपन्यांच्या अमेरिकेतील औषधी उत्पादनांच्या निर्यातातीत दमदार ३३ टक्क्य़ांची वाढ झाली आहे.
औषधी उत्पादनांच्या निर्यातीस चालना देणाऱ्या ‘फार्मास्युटिकल्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया (फार्माक्सिल)’ या संघटनेने आयोजित केलेल्या गोरेगाव येथील एनएसई संकुलातील तीन दिवसांच्या ‘आयफेक्स २०१६’ या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य सचिव रिटा तेवटिया यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जगभरात सर्वत्र आणि देशातही अन्य उद्योग क्षेत्रातून निर्यातीला उतरती कळा लागली असताना, औषधी कंपन्यांच्या निर्यात कामगिरीचे कौतुक केले. २०१५-१६ मध्ये भारतीय औषधी निर्यात ९.७ टक्क्य़ांनी वाढून एक लाख कोटी रुपयांच्या पल्याड गेली आहे. आदल्या वर्षी २०१४-१५ मध्ये औषधी निर्यातीचे प्रमाण ९६,००० कोटी रुपये होते.
भारताच्या औषधी उद्योगाच्या एकूण महसुलात जेनेरिक औषधांचा हिस्सा ७५ टक्क्य़ांच्या घरात असून, जागतिक जेनेरिक औषधांच्या पुरवठय़ात भारताचा पहिल्या क्रमांकाचा २० टक्के हिस्सा आहे, अशी माहिती फार्माक्सिलचे अध्यक्ष आशुतोष गुप्ता यांनी दिली. त्यामुळे जगाला परवडण्याजोग्या आणि दर्जेदार औषधांच्या पुरवठय़ात भारताची अग्रेसर भूमिका राहिली आहे. भारतीय औषध निर्माणक्षेत्राचा हाच ब्रॅण्ड असून, जगाचे औषधभांडार म्हणून मानाचे स्थान आपण पटकावू पाहत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. भारताची सध्याचीऔषधी बाजारपेठ २० अब्ज डॉलरच्या घरात असून, पेटंटप्राप्त औषधांचा हिस्सा केवळ नऊ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.