सहा महिन्यांत ५.२० कोटींची नव्याने भर

वाढत्या स्मार्टफोनमुळे देशातील इंटरनेटधारकांची संख्येत झपाटय़ाने वाढत होत असून जून २०१५ अखेर भारतातील नेटकरांची संख्या एकूण ३५.२० कोटी झाली आहे. २०१५ मधील पहिल्या सहा महिन्यांत ५.२० कोटी नवीन नेटकरांची यात भर पडली आहे.
इंटरनेट तसेच मोबाइल क्षेत्रातील ‘इंटरनेट अ‍ॅन्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ (आयएएमएआय) ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण इंटरनेटधारकांपैकी ६० टक्के वापरकर्ते हे मोबाइलच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान वापरतात. मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जून २०१५ अखेर २१.३० कोटी नोंदली गेली आहे.
ऑक्टोबर २०१४ मधील २७.८० कोटी इंटरनेटधारकांच्या तुलनेत यंदा त्यात २६ टक्के वाढ झाली आहे. तर मोबाइल इंटरनेटधारकांचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढून १५.९० कोटी झाले आहे.
भारतात दशकभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या एक कोटींवरून १० कोटींपर्यंत वाढली. तर पुढील तीन वर्षांत ती दुप्पट, १० कोटींवरून २० कोटी झाली. आणखी १० कोटी धारक नोंदविण्यास या क्षेत्राला केवळ एकच वर्ष लागले.