टाटा उद्योगसमूह पुढील दोन वर्षांत विविध उद्योगांमध्ये ४५ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या भांडवलाची गुंतवणूक करणार असून त्याचवेळी भारतासह जागतिक स्तरावरील बाजारपेठेतही विस्ताराकडे लक्ष पुरविण्यात येईल, असे टाटा समूहाचे नवे प्रमुख सायरस मिस्त्री यांनी बुधवारी सांगितले.
कारभार हाती घेतल्यानंतर अध्यक्ष म्हणून जारी केलेल्या पहिल्याच संदेशाद्वारे मिस्त्री यांनी आपल्या पुढील वाटचालीची रूपरेषा सादर केली. अलीकडेच नेतृत्वात बदल झालेला असला तरी ‘टाटा समूहा’च्या मध्यवर्ती गटात बदल होणार नाही.  त्या त्या उद्योगांमधील संबंधितांनी मुख्य भूमिका यापुढेही तशीच कायम ठेवावी, असे मिस्त्री यांनी स्पष्ट केल.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाची जागतिक स्तरावरील उलाढाल १०० अब्ज डॉलर्सच्या घरात गेली, असा गौरवपूर्ण उल्लेख करून नेतृत्वात बदल झाल्यानंतर अन्य स्तरांवरही बदलांचे वारे वाहू लागतात परंतु टाटा समूहातील मध्यवर्ती गटामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, असे मिस्त्री यांनी नमूद केले आहे. गेल्या तीन वर्षांत समूहाने विविध उद्योगांमध्ये ५० हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करून ८५ हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती केली, याकडे लक्ष वेधत येत्या दोन वर्षांत ४५ हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे, असे मिस्त्री यांनी सांगितले. भारताखेरीज जागतिक स्तरावर टाटा समूहाच्या विस्ताराची योजना असून त्याद्वारे आशिया, आफ्रिका आदी ठिकाणच्या बाजारपेठा काबीज करण्याची टाटा समूहाची योजना आहे, असेही त्यांनी नमूद केले.