अतिजलद ४जी मोबाइल तंत्रज्ञान सेवेसाठी सज्ज असलेल्या मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओला १.८० लाख मनोऱ्यांचा आधार मिळाला आहे. कंपनीने याबाबत नवा करार अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशनबरोबर (एटीसी) केला आहे. याअंतर्गत रिलायन्स जिओच्या मोबाइल सेवेसाठी भारतातील ११ हजार मनोऱ्यांचे तांत्रिक-लहरींचे व्यासपीठ उपलब्ध होईल. मनोरे सहकार्यासाठी एटीसी ही रिलायन्सकरिता तिसरी कंपनी ठरली आहे.
४जीसाठी (२३०० मेगाहर्ट्झ) २२ परिमंडळासाठी देशव्यापी परवाना मिळालेली रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे. नुकत्याच झालेल्या २जीसाठीच्या (२३०० मेगाहर्ट्झ) ध्वनिलहरी निविदा प्रक्रियेतही (१४ परिमंडळातील) सहभाग घेत रिलायन्स जिओने प्रस्थापित कंपन्यांसाठी कट्टर स्पर्धक निर्माण केला आहे. रिलायन्स जिओने याव्यतिरिक्त फायबर केबल नेटवर्कसाठी आर कॉमबरोबरचेही सहकार्य घेतले आहे.
जलद इंटरनेट सेवेसाठीच्या ४जी तंत्रज्ञानाकरिता रिलायन्स जिओने यापूर्वी अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर कॉम), देशातील पहिल्या क्रमांकाची मोबाइल कंपनी भारती एअरटेल व वाओम नेटवर्क यांच्याबरोबर सहकार्य करार पार पाडले आहेत. यानुसार भारतीचे ८२ हजार, आर कॉमच्या ४५ हजार, तर वाओम नेटवर्कच्या ४२ हजार मोबाइल मनोऱ्यांचे साहाय्य रिलायन्स जिओला प्राप्त होणार आहे.

४जीसाठी जोरदार तयारी; २,००० विक्री दालनांची सुसज्जता
 मोबाइलच्या व्यासपीठावरील अतिजलद इंटरनेट सुविधा देण्यास रिलायन्स समूह उत्सुक आहे. त्यासाठी त्याची तयारी जोरदार सुरू असून येत्या सहा महिन्यांत ही सेवा प्रत्यक्षात आणायची, यासाठी कंपनी इरेला पेटली आहे. कंपनीने डिजिटल एक्स्प्रेस मिनी या नावाखाली दूरसंचार उत्पादने विकणारी साखळी सुरू करण्याचे निश्चित केले आहे. अशी २ हजारांहून अधिक दालने कंपनी देशभरात सुरू करण्याच्या स्थितीत आहे. यामधून सिम कार्ड, मोबाइल हॅण्डसेट, टॅबलेट तसेच संबंधित अन्य उत्पादने विकली जातील. ही दालने किमान २५० चौरस फूट आकाराची असतील. येथे रिलायन्स जिओ इन्फोकॉमशी निगडित अन्य सेवा-उत्पादनेही पुरविली जातील. रिटेल क्षेत्रातून मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा असलेल्या रिलायन्सची सध्या ‘डिजिटल’ नावाच्या उपदालनांमधून विद्युत उपकरणे विकली जातात.