ऑनलाइन औषध विक्रीच्या कथित बेकायदेशीर व्यवसायाविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (एआयओसीडी)ने पुकारलेल्या बुधवारच्या (१४ ऑक्टोबर) एक दिवसाच्या बंदमध्ये राज्यातून सुमारे ५५ हजार औषध विक्रेते सहभागी होत आहेत. या बंदला आणि तो ज्या मागण्यांसाठी पुकारण्यात आला आहे, त्याला विविध पातळ्यांवर पाठिंबाही मिळत असल्याचे राज्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
बंदला पाठिंबा देणाऱ्या संस्थांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, कन्झ्युमर प्रॉडक्ट डिलर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, पुणे व्यापारी महासंघ व अनेक अनेक जिल्हास्तरीय संघटनांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. डॉक्टरांच्या शिफारशीविना सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीला पायबंद घातला जावा, अशी या संस्था-संघटनांचीही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आपापली दुकाने बंद ठेवण्याबरोबरच औषध विक्रेते बुधवारी आझाद मैदान येथे दिवसभराचे धरणे आंदोलनही करणार असल्याचे नावंदर यांनी सांगितले. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथून सुमारे ५,००० औषध विक्रेते मोर्चाने येऊन हे आंदोलन करतील, अशी त्यांनी माहिती दिली.