खाजगी उद्योगांना बँक व्यवसाय खुले करणाऱ्या बँकिंग सुधारणा विधेयकाच्या विरोधात कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या चार विविध संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पुकारल्या गेलेल्या संपात सुमारे ७ लाखांनी सहभाग केल्याचा दावा करण्यात आला आहे. संपानिमित्त ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’च्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील हुतात्मा चौक येथून सकाळी मिरवणूक काढून नंतर तिचे आझाद मैदानात सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी नव्या बँकिंग सुधारणा विधेयकावरून सरकारवर तीव्र टीका करण्यात आली. ‘बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’, ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन’ आणि ‘नॅशनल यूनियन ऑफ बँक एम्प्लॉईज’चे सदस्य-बँक कर्मचारी संपात सहभागी झाले होते.