रिलायन्सच्या ‘बिग एफएम’ची जबर घसरण
देशातील प्रमुख रेडिओ वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी रस्सीखेच चालली असली तरी सर्वाधिक महसूल मिळविण्याच्या बाबतीत ९४.३ माय एफएमने बाजी मारली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१२ या अर्धवार्षिकात कंपनीच्या महसुलामध्ये  आधीच्या वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक १६% वाढ झाली आहे.
रेडिओ वाहिनीसाठी निवडण्यात येणारे कार्यक्रम, सादर होणारे जाणारे संगीत, आमच्या श्रोत्यांशी असलेली आगळीक या जोरावर हे यश पादाक्रांत करण्यात आल्याचे ९४.३ माय एफएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष भाटिया यांनी नमूद केले. रेडिओ वाहिनीला महानगरांच्या तुलनेत निमशहरांमध्ये अधिक श्रोते मिळत असल्याचेही ते म्हणाले. बिकट अर्थव्यवस्थेत या कालावधीतही श्रोत्यांसह जाहिरातदारांनी केलेल्या सहकार्याचेही त्यांनी आभार मानले आहे. ९३.४ माय एफएम ही रेडिओ वाहिनी डीबी कॉर्प या माध्यम समूहाद्वारे २००६ पासून चालविली जाते. देशातील सात राज्यांमधील १७ शहरांमध्ये ही वाहिनी ऐकली जाते.
विशेष म्हणजे, चालू पहिल्या अर्ध अर्थवार्षिकात अनिल रिलायन्सच्या धीरुभाई अंबानी समूहातील बिग एफएमच्या महसुलात मात्र २६ टक्के घट नोंदली गेली आहे. उपरोक्त वाहिन्यांच्या संकेतस्थळावर ३ डिसेंबरअखेपर्यंत दिलेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.