यंदाच्या सणांचा हंगाम तोंडावर आला असतानाच बँकांच्या सलग सुटय़ांचे पर्व येत्या आठवडय़ापासूनच सुरू होत आहे. या अपरिहार्य ‘बँका बंद’मुळे खातेदारांचे मात्र ऐन सण-समारंभाच्या तोंडावर हाल होणार आहेत.
अर्धवार्षिक व्यवहारांसाठी बँका पुढील मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी ग्राहकांसाठी बंद राहणार आहेत. तर त्यापुढे  गुरुवार व शुक्रवार सलग दोन दिवस म्हणजे २ व ३ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे महात्मा गांधी जयंती व विजयादशमीनिमित्ताने सार्वजनिक सुटीमुळे बँकांचे व्यवहार होणार नाहीत. लगोलग शनिवार, ४ ऑक्टोबरला बँका अर्धवेळच सुरू राहणार आहेत. रविवारच्या सुट्टीनंतर, सोमवारी ५ ऑक्टोबरला बकरी ईदनिमित्ताने पुन्हा बँका बंद राहणार आहेत.
राज्यनिहाय सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे असला तरी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता वरीलपैकी एखाद दिवशी बँका सुरू ठेवण्याबाबत आदेश जारी होण्याची शक्यता कमी असल्याचे बँक कर्मचारी संघटना ‘एआयबीईए’चे सरचिटणीस विश्वास उटगी यांनी सांगितले.
दरम्यान, सलग सुटय़ा लक्षात घेता गुजरात उच्च न्यायालयाने तेथील व्यावसायिकांना प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची ३० सप्टेंबरची मुदत महिन्याभराने विस्तारण्याचे आदेश दिले आहेत. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने दिवसाचे२४ तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.