गुजरातमधील भुज आणि गांधीधाम परिसरानजीक मुंद्रा बंदर
वार्षिक व्यवसाय १०० दशलक्ष टन
परवानगी मिळाल्याने पर्यावरण आणि सीआरझेड संदर्भातील सर्व मुद्दे निकाली काढता येतील
अदानींकडे मुंद्रा, दाहेज, हजिरा, गोवा आणि विशाखापट्टणम ही बंदरे
‘अदानी पोर्ट अँड एसईझेड लि.’अंतर्गत मुंद्रा बंदरानजीकची ८, ४८१ हेक्टर जमिनीवरील ‘सेझ’ला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाल्याचे बुधवारी कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मंत्रालयाच्या परवानगीमुळे ‘अदानी समूहा’ला विविध प्रक्रिया प्रकल्प राबवता येणार आहेत. यात खारे पाणी आणि वनस्पतींवर प्रक्रिया करणारे प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय निर्यातीला वेग देता येईल.
केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने अदानी समूहाच्या मुंद्रा येथील ८, ४८१ हेक्टर जमिनीवरील ‘सेझ’साठी परवानगी आणि सीआरझेड कायद्यातील अटींसंदर्भात संमती दिली आहे, असे कंपनीने निवेदनात स्पष्ट केले.  बंदर जमिनीवरील विकासातील अदानी समूह भारतातील एकमेव आहे. या अंतर्गत अदानी समूह आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी विशेष आर्थिक क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधा तयार करून देणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस लागून अधिक गतीने विकास प्रक्रिया राबवण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे समुद्र, रस्ते आणि रेल्वेच्या माध्यमातून विनाअडथळा संपर्कजाळे विणता येणार असल्याचे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्पष्ट केले. थेट परकीय गुंतवणूक आणि निर्यात आधारीत वाढ डोळ्यासमोर ठेवून सेझची स्थापना करण्यात आली आहे. सेझमधील उद्योग आणि व्यवसायांमध्ये निर्माण होणाऱ्या कच्च्या मालास आयात, अबकारी तसेच सेवा करांमधून सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंद्रा बंदरासाठी व्यावसायिक मूल्य वाढवले जाईल, असेही अदानी यांनी स्पष्ट केले.