गेल्या महिन्यात प्राथमिक भागविक्री प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या अ‍ॅडलॅब्ज एन्टरटेन्मेंटची सूचिबद्धता येत्या सोमवारी, ६ एप्रिल रोजी येऊ घातली आहे.
भांडवली बाजारात उतरण्यासाठी गेल्या महिन्यात चार ते पाच कंपन्यांची भागविक्री प्रक्रिया पार पडली. त्यात १० मार्च रोजी खुले झालेल्या अ‍ॅडलॅब्ज वगळता इतरांना फारसे यश आले नाही. आयनॉक्स विन्ड आणि ऑटेल कम्युनिकेशन्सलाही बऱ्यापैकी यश मिळाले होते.
मनोरंजन उद्यान क्षेत्रातील अ‍ॅडलॅब्जने उपलब्ध करून दिलेल्या समभागांना १.११ पट प्रतिसाद मिळाला होता. यामाध्यमातून कंपनीने ३७६ कोटी रुपये उभारले. पैकी ६० कोटी रुपये हे मुख्य गुंतवणूकदारांकडून प्राप्त झाले. संस्थागत गुंतवणूकदारांकडूनही मोठय़ा प्रमाणात बोली लावली गेली. कंपनीने १८० ते २१५ रुपये भाव समभागासाठी देऊ केला होता. अखेर त्याची निश्चिती १८० रुपयांवर झाली.

जूनमध्ये खोपोलीत नवे हॉटेल
चित्रपट उद्योगातील मनमोहन शेट्टी प्रवर्तक असलेल्या अ‍ॅडलॅब्ज एन्टरटेन्मेंटद्वारे थ्रिल पार्कही चालविले जाते. अ‍ॅडलॅब्जचे ‘अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका’ हे मनोरंजन उद्यान मुंबईनजीकच्या खोपोली येथेही आहे. या उद्यानाने स्थापनेची दोन वर्षे नुकतीच पूर्ण केली असून, आतापर्यंत २० लाख लोकांनी या उद्यानाला भेट दिल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या निमित्ताने कंपनी नोव्होटेल इमॅजिका खोपोली हे २८७ खोल्यांचे अद्ययावत हॉटेलही येत्या जूनमध्ये सुरू करणार आहे.