राज्यात पिकविल्या शेतमालाच्या अंतिम ग्राहकापर्यंत प्रवासासाठी सुयोग्य मूल्य शृंखला विकसित करून, शेतकरी आणि लघू व मध्यम उद्योजक यांच्या भागीदारीचा २०१२-१३ मध्ये २० खासगी कंपन्यांच्या सहभागाने सुरू झालेल्या प्रयोगाला ठोस रूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस बडय़ा उद्योगांच्या प्रमुख व मुख्याधिकाऱ्यांशी शुक्रवारी चर्चा करणार आहेत.
विशेषत: मका, तांदूळ, सोयाबीन, कापूस, ऊस, विविध फळे, भाजीपाला व कडधान्य यांचे उत्पादक पाच लाख शेतकऱ्यांना सामावून घेणाऱ्या अशा ३० मूल्य साखळ्या गेल्या दोन वर्षांत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) कडून केल्या गेलेल्या सुसूत्रतेने खासगी-सार्वजनिक भागीदारीतून विकसित झाल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह, डब्ल्यूईएफच्या लिझा ड्रेअर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत, रॅलीज इंडिया, एडीएम, आयटीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, हिंदुस्तान युनिलीव्हर, अदानी-विल्मर, कारगिल इंडिया, फ्यूचर समूह, यूपीएल-अ‍ॅडव्हान्टा, सिजेन्टा, मोन्सँटो, जैन इरिगेशन, रुची सोया आदी २८ कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे. शेतीद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन विकसित करण्याचा यामागे उद्देश आहे.