‘टाटा बोल्ट’ व ‘टाटा झेस्ट’ ही दोन नवीन प्रवासी वाहने विक्रीसाठी तयार झालेली असतानाच टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अंकुश अरोरा यांनी कंपनीला रामराम ठोकला आहे. टाटा मोटर्सच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात त्यांच्या राजीनाम्याची ही बातमी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.
टाटा मोटर्सने आपली विक्री दालने नव्या पद्धतीने सुशोभित करण्याचे महत्वाचे काम हाती घेतले होते व या प्रकल्पाचे अरोरा हे प्रमुख होते. आंतरराष्ट्रीय सल्लागार ‘फीच’ या प्रकल्पासाठी सल्लागाराची भूमिका वठवत होती. संपूर्ण विक्रेते व विक्री दालनासहित टाटा मोटर्सचे विपणन जाळे कात टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच व दोन नवीन प्रवासी वाहनांचे अनावरण १५ दिवसात होणार असतानाच अंकुश अरोरा यांच्या राजीनाम्याला विशेष महत्त्व आले आहे. टाटा मोटर्समध्ये येण्यापूर्वी अरोरा हे जनरल मोटर्स इंडियामध्ये टाटा मोटर्सचे दिवंगत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ल स्लिम यांचे सहकारी म्हणून कार्यरत होते. स्लिम यांच्या ‘कोअर टीम’चे सदस्य असलेल्या अरोरा यांच्याकडे काही अंतर्गत बदलाचे नेतृत्व टाटा मोटर्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने सोपविले होते. यामध्ये ग्राहकांना नवीन अनुभूती देणाऱ्या विक्री दालनाच्या सुशोभीकरणाचे, विक्रेत्यांचे जाळे सुदृढ करण्यासाठी ३,००० नवीन विक्रेत्यांची फौज टाटा मोटर्सने भरती केली आहे. हे सर्व प्रकल्प अंकुश अरोरा यांनी हाताळले होते. कंपनीच्या जनसंपर्क विभागाने काही दिवसांपूर्वी अंकुश अरोरा यांचा माध्यमांशी वार्तालाप आयोजित केला होता. या वार्तालाभात अरोरा यांनी या सर्व प्रकल्पांबाबत विस्तृत माहिती दिली होती. टाटा मोटर्स च्या व्यवसाय वृद्धीच्या नवीन धोरणांचा एक भाग म्हणून शहरातील तरुण ग्राहकांना आकर्षकि करण्यासाठी ‘पॉवर स्टिअिरग’ची सोय असलेली ‘नॅनो ट्वीस्ट’ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली असेही अरोरा या वार्तालापादरम्यान सांगितले.  
‘टाटा बोल्ट’ व ‘टाटा झेस्ट’ ही दोन नवीन प्रवासी वाहने टाटा मोटर्सच्या अस्तित्त्वाची लढाई असल्याचे अंकुश अरोरा यांचे मानणे होते. टाटा मोटर्स प्रामुख्याने डिझेल वाहने तयार करते. ‘टाटा बोल्ट’ व ‘टाटा झेस्ट’ ही वाहने पेट्रोल इंधनावर चालणार असल्याने टाटा मोटर्ससाठी सुद्धा हा संक्रमणाचा काळ आहे. मागील एप्रिल महिन्यातील विक्रीच्या तुलनेत चालू वर्षांच्या एप्रिल महिन्याची प्रवासी वाहनांची विक्री तब्बल ३६ टक्क्याने घटली. एप्रिल २०१४ मध्ये टाटा मोटर्सने अवघ्या ७,४४१ प्रवासी वाहनांची विक्री केली.
टाटा मोटर्ससारख्या कंपनीला अरोरा यांच्या बदल्यात दुसरा अधिकारी शोधणे कठीण नसले तरी टाटा मोटर्स परिवारामधील प्रवासी वाहने वितरक, समभाग विश्लेषकांनी अरोरा यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल असा दावा केला आहे.