सदोष एअर बॅग असलेल्या सेदान श्रेणीतील तब्बल ७,१२९ कोरोला कार टोयोटाने माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. जपानी कंपनी टोयोटाची कोरोला ही प्रीमियम गटातील प्रवासी कार आहे.
टोयोटा किलरेस्कर मोटरने या कोरोला कारचे एप्रिल २००७ ते जुलै २००८ दरम्यान निर्मिती केली आहे. त्यातील प्रवासी आसनाच्या बाजूच्या एअर बॅगमध्ये दोष आढळल्यानंतर कंपनीने माघारीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. टोयोटाने यापूर्वीही २०१३ मध्ये निवडक कोरोला परत घेतल्या होत्या. जानेवारी २००३ ते जून २००३ दरम्यान निर्मित जगभरातील कोरोला परत बोलावण्यात आल्या होत्या.
सदोष एअर बॅगबाबत यापूर्वी जपानी बनावटीच्या निस्सान, होंडा या कंपन्याही चर्चेत आल्या होत्या. भारतात सदोष वाहने परत बोलाविण्याच्या संकल्पनेनंतर विविध कंपन्यांनी जुलै २०१२ पासून आतापर्यंत आठ लाख वाहने माघारी बोलाविली आहेत.