भारताच्या हवाई सेवेत झेपावणाऱ्या एअर एशिया इंडियाचे दुसरे उड्डाण दक्षिणेतीलच कोचीसाठी होणार आहे. कंपनी बंगळुरूतून कोचीसाठी आपली दुसरी विमानसेवा सुरू करेल.
एअर एशिया इंडियाचे कोचीसाठी २० जुलैला उड्डाण होणार असून, त्यासाठी अवघा ५०० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. ही रक्कम प्रोत्साहनपूरक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
बंगळुरू-कोची व परतीच्या प्रवासासाठी कंपनीने तिच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी सुरू केली असून, ती २२ जूनपर्यंत असेल. २० जुलै ते २५ ऑक्टोबरदरम्यानच्या प्रवासासाठी ती असेल. कोचीसाठी २० जुलैला उड्डाण; ५०० रुपये तिकीटमाफक दरातील देशांतर्गत हवाई प्रवासी सेवेत दाखल झालेली एअर एशिया इंडिया ही चौथी कंपनी आहे. टाटा समूहाबरोबरच्या भागीदारीतील मूळच्या मलेशियाच्या एअर एशियाच्या भारतीय व्यवसायास गेल्याच आठवडय़ात प्रारंभ झाला. यावेळी कंपनीने एक हजार रुपयांपेक्षा कमी दर आकारत बंगळुरू ते पणजी (गोवा) ही सेवा सुरू केली. कंपनीचे दर स्पर्धकांपेक्षा ३५ टक्के कमी असल्याचा दावा एअर एशिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य यांनी यापूर्वीच केला आहे.