नव्या दमाच्या खासगी हवाई वाहतूक कंपन्या वाढत्या स्पर्धेपोटी अनोख्या धावपट्टय़ावर धावू लागल्या आहेत. टाटा समूहाचा पुनर्प्रवेश सुलभ करणाऱ्या एअर एशियाने देशाच्या आर्थिक राजधानीतून उड्डाण घेतानाच प्रति किलोमीटर एक रुपये दराने तिकीट उपलब्ध करून दिले आहे. तर अर्थसंकटातील स्पाइसजेटने ३०० कोटी रुपयांची निधी उभारणी यशस्वी केली आहे.
दक्षिणेत मुख्यालय असलेल्या एअर एशियाने गुरुवारी प्रथमच नवी दिल्लीहून बंगळुरू, गुवाहाटी व पणजीसाठी हवाई वाहतूक सेवा सुरू केली. असे करताना कंपनीने एक रुपया प्रति किलोमीटरने तिकीट उपलब्ध करून दिले. दिल्ली ते उपरोक्त शहरांसाठी त्यामुळे आता १,७०० रुपये तिकीट लागेल.
याचबरोबर लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या बंगळुरू ते विशाखापट्टणमसाठी एक रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे तिकीट उपलब्ध केले आहे. या दोन शहरांसाठी आता १,४०० रुपये दर लागेल. या दरांमध्ये १८ जून २०१५ ते ३१ मे २०१६ दरम्यानच्या प्रवासासाठी २४ मे २०१५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या स्पाइसजेटलाही तब्बल ३०० कोटी रुपयांचे निधीरूपी इंधन प्राप्त झाले आहे. याचबरोबर कंपनीने गुरुवारी तिचे सहसंस्थापक अजय सिंह यांना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले आहे. तसेच शालिनी व हर्षां वर्धाना सिंह यांनाही कंपनीत स्थान मिळाले आहे.
चेन्नई येथे गुरुवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपरोक्त निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येऊन याबाबतची माहिती मुंबई शेअर बाजाराला देण्यात आली. यानिमित्ताने कंपनीने मार्च २०१६ पर्यंत ५० विमाने आपल्या ताफ्यात नोंदविण्याचेही जाहीर केले.
स्पाइसजेटचे सहसंस्थापक सिंह हे २०१० मध्ये बाहेर पडले होते. कंपनी आर्थिक संकटात सापडल्यानंतर सिंह यांनी मुख्य प्रवर्तक बनलेल्या कलानिधी मारन व त्यांच्या काल एअरवेजचे सर्व ५८.४६ टक्के भांडवल फेब्रुवारीमध्ये खरेदी केले. १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा कार्यक्रम सरकारला सादर केल्यानंतर पैकी ५०० कोटी  फेब्रुवारीमध्ये कंपनीत गुंतविण्यात आले. आश्वासित रकमेपैकी निम्मी रक्कम आता पूर्ण झाली आहे.