रिलायन्स जिओच्या ४जी तंत्रज्ञानाची प्रतीक्षा मोबाईल फोनधारक उत्सुकतेने करीत असतानाच, भारती एअरटेलने कुरघोडी करीत ४जी तंत्रज्ञानावर आधारीत सेवेच्या देशव्यापी विस्ताराची घोषणा गुरुवारी केली.
देशातील निवडक शहरांमधून या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीनंतर गुरुवारपासून एअरटेलची ४जी सेवा भारतातील २९६ शहरांमधून उपलब्ध होत असल्याची घोषणा करण्यात आली. मोबाइलधारक ग्राहकसंख्येत २३ कोटी ग्राहकांसह सर्वोच्च स्थानी असलेल्या भारती एअरटेलची ४जी सेवा एप्रिल २०१२ मध्येच कोलकत्यातून सुरू झाली आहे. कोलकात्यासह प्रमुख ५१ शहरांमध्ये तूर्त ही सेवा उपलब्ध होती. ती आता विस्तारली जाणार आहे. या सेवेकरिता कंपनीला २०१० मध्ये १४ परिमंडळासाठी परवाना प्राप्त झाला.
मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओची ४जी सेवा वर्षभरापासून प्रतीक्षित आहे. ही सेवा आता डिसेंबर २०१५पर्यंत सुरू होण्याची चर्चा दूरसंचार क्षेत्रात आहे. या तंत्रज्ञानासाठी देशव्यापी (२२ परिमंडळ) परवाना मिळविलेली रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे.
स्मार्टफोन, डोंगल, ४जी हॉटस्पॉट्स, वाय फाय डोंगलसह एअरटेलची ४जी जलद तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असल्याची घोषणा भारती एअरटेलच्या भारत व दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी गुरगाव येथे केली.

३जी ते ४जी संक्रमण होणार विनामूल्य
विद्यमान ३जी सेवाधारकांना त्याच किमतीतच एअरटेलचे नवीन ४जी सेवा(डाटा) उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी या तंत्रज्ञानावरील नवीन सिम मोबाइलमध्ये बसवावे लागेल. याशिवाय प्रत्येक ४जी सिमबरोबर सहा महिन्यांचे अमर्याद संगीत ऐकण्याची सुविधा देऊ करण्यात आली आहे. ४,००० रुपयांतील स्मार्टफोन व हजारो चित्रपट तसेच लोकप्रिय व्हिडीओ असलेले ‘विन्क मूव्हीज’ हे मोबाइल अॅपही एअरटेलने बाजारात आणले आहे. ४जी तंत्रज्ञान सामावू शकणारे मोबाइल फोन एअरटेलने सॅमसंग व फ्लिपकार्टच्या माध्यमातून उपलब्ध केले आहेत.