येत्या २ फेब्रुवारीपर्यंत मागविण्यात येणाऱ्या नव्या पेमेन्ट बँकेसाठी देशातील सर्वात मोठय़ा भारती एअरटेल या दूरसंचार कंपनीने स्वारस्य दाखविले असून खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेने तिच्यासाठी आर्थिक व्यवसाय पुरवठादार म्हणून पुढे येण्याची उत्सुकता दाखविली आहे.
ठेवी स्विकारण्याव्यतिरिक्त अन्य बँकिंग सुविधा देणाऱ्या ‘पेमेन्ट बँक’ व्यवसायासाठीची अंतिम मार्गदर्शक तत्त्वे रिझव्‍‌र्ह बँकेने नोव्हेंबर २०१४ मध्ये जारी केली होती. त्यासाठी इच्छुकांकडून येत्या २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
या नव्या बँक व्यवहारासाठी भारती एअरटेलही अर्ज करणार असून कोटक महिंद्र बँकेबरोबर तिची या क्षेत्रात भागीदारी असेल. नव्या व्यवसाय रचनेत कोटक महिंद्र बँकेचा १९.९ टक्के हिस्सा असेल. या यंत्रणा उभारणीसाठीचे आर्थिक पाठबळ एअरटेलला कोटक महिंद्र बँकेकडून उपलब्ध होईल.
एअरटेल एम कॉमर्स सव्‍‌र्हिसेस लिमिटेड या आपल्या उपकंपनीद्वारे एअरटेल पेमेन्ट बँक परवाना मिळविण्यासाठी अर्ज करणार आहे. कंपनीकडे सध्या याद्वारे प्रिपेड पेमेन्ट परवाना आहे. तो पेमेन्ट बँकेसाठी लागणाऱ्या यंत्रणेकरिता परिवर्तन केला जाईल. विद्यमान उपकंपनीमार्फत भारती समूह सध्या ‘एअरटेल मनी’ नाममुद्रेंतर्गत मोबाईल पैसे हस्तांतरण सुविधा पुरवितो.
पेमेन्ट बँकेसाठी देशातील खासगी बँक क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या अ‍ॅक्सिस बँकेनेही सहकार्याची इच्छा प्रदर्शित केली होती. कर्ज वितरित न करणाऱ्या वित्तसंस्था, कंपन्या, उद्योग समूह, मोबाईल कंपन्या या व्यवसायात उतरू शकतात. पेमेन्ट बँकेसाठी अर्जदार कंपनीला १०० कोटी रुपयांच्या भांडवलाची अट आहे.