देशातील सर्वात मोठी मोबाइल सेवा पुरवठादार भारती एअरटेलने ३० कोटी ग्राहकसंख्येचा टप्पा पार केला आहे. ग्राहकसंख्येत जागतिक स्तरावर चौथी कंपनी असलेल्या या कंपनीचे विविध २० देशांमध्ये अस्तित्व आहे.
भारती एअरटेल भारतीय दूरसंचार व्यवसायाची दोन दशके येत्या वर्षांत पूर्ण करीत आहे. कंपनीने २००९ मध्ये पहिल्यांदाच १० कोटींचा पल्ला गाठला. यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आत पुन्हा १० कोटी ग्राहकसंख्या पार केली. २००९ मध्ये कंपनीचे १० कोटी तर २०१२ अखेर कंपनीचे २० कोटी ग्राहक झाले होते.
भारती एअरटेल ही दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या क्रमांकाची कंपनी असून अन्य १७ देशांमध्ये तिचे ७ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. मिनिटाला ३११ अब्ज कॉल कंपनीच्या नेटवर्कमध्ये नोंदले जातात. भारताच्या वायरलेस (मोबाइल, सीडीएमए) ग्राहक बाजारपेठेत २२.८८ टक्के हिस्सा असलेल्या एअरटेलने ३० मे २०१४ अखेर ३३.४७ कोटी ग्राहक राखले आहेत.
ल्ल  यूनिनॉरचा अनोखा विक्रम
एकाच दिवसात सर्वाधिक दालने खुली करीत यूनिनॉरने विक्रम नोंदविला आहे. कंपनीच्या या व्यावसायिक विस्ताराची दखल गिनीज बुकमध्ये घेतली गेली आहे. मूळच्या नॉर्वेच्या या कंपनीने सोमवारी एकाच दिवशी देशातील विविध भागांत एकदम ३६२ दालने सुरू केली. १० हजार ग्राहक मात्र ५ किलोमीटरच्या पट्टय़ात नसलेले कंपनीचे अस्तित्व या भागात ही दालने सुरू करण्यात आली आहेत. ६ परिमंडळांमध्ये १.५० लाख ग्राहकांपर्यंत कंपनी याद्वारे आपली दूरसंचार सेवा देणार आहे, अशी माहिती यानिमित्ताने यूनिनॉरचे मुख्य विपणन अधिकारी राजीव सेठी यांनी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. ताफ्यात सर्वाधिक दालने असणारी यूनिनॉर ही देशातील दुसरी कंपनी ठरली आहे. कंपनी सध्या उत्तर प्रदेश (पश्चिम), उत्तर प्रदेश (पूर्व), बिहार (झारखंडसह), आंध्र प्रदेश, महाराष्ट्र (मुंबई वगळता) व गुजरातमध्ये सेवा पुरविते. कंपनीने फेब्रुवारीमध्ये आसाम परिमंडळातील ध्वनिलहरी परवाना मिळविला; मात्र अद्याप तेथे सेवा सुरू करण्यात आलेली नाही.