२००९ मधील मोबाईल कंपन्यांमधील दरकपातीसाठी लागलेली चढाओढीचा मोबाईलधारकांनी चांगलाच अनुभव घेतला आहे आणि त्यानंतर जवळपास तीन वर्षे कॉलदर जैसे थे राहिल्यानंतर आता ते पुन्हा वरच्या दिशेने चढू लागण्याची चिन्हे आहेत. वाढता खर्च, विस्तारासाठी होत असलेली प्रचंड गुंतवणूक त्यातच स्पेक्ट्रमसाठी वाढलेल्या किमती अन्य नियामक खर्चापायी, अनेक कंपन्यांना नफाक्षमता सांभाळणेही कठीण बनले होते. मात्र ही कोंडी फोडणार कोण आणि दरवाढीला सुरुवात कोण करेल, हाच प्रश्न उरला होता, त्याचे उत्तर एअटेलने दिले आहे. भागधारकांचा कंपनीवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्यच होता, असे भारती एअरटेलने प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.