जागतिक आर्थिक महासत्तेच्या दरबारी भांडवली बाजाराच्या माध्यमातून सर्वात मोठी यशस्वी निधी उभारणी करणाऱ्या ‘अलिबाबा’ने भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. कंपनीचे संस्थापक व चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनी भारत दौऱ्यावरच येथील उद्यमशील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी रस दाखविला आहे.
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे संस्थापक, अध्यक्ष जॅक मा यांनी बुधवारी ‘फिक्की’तर्फे आयोजित चर्चात्मक कार्यक्रमास हजेरी लावली. जॅक यांनी आपल्या पहिल्या भारत भेटीतच येथील विशेषत: नव्या दमाच्या माहिती तंत्रज्ञान आणि इ-कॉमर्स व्यवसायात रुची असल्याचे दर्शविले.
कंपनी तूर्त भारतात अस्तित्व राखून असली तरी नव्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यास आपल्याला निश्चितच आवडेल, अशी इच्छा त्यांनी यावेळी प्रदर्शित केली. भारतासारख्या विकसनशील देशाचे भवितव्य हे इंटरनेटद्वारेच अधिक उज्ज्वल होऊ शकते, या मतावर विश्वास व्यक्त करत जॅक यांनी येथील लघु व मध्यम उद्योगांबरोबरची भागीदारी भविष्यातही कायम राहिल, याबाबत शब्द दिला.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क भांडवली बाजारात जॅक यांच्या अलिबाबा कंपनीने प्राथमिक खुल्या भागविक्रीद्वारे २५ अब्ज डॉलर रक्कम उभारली. जगाच्या आर्थिक इतिहासात या माध्यमातून उभारली गेलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. विविध खाद्य वस्तू विक्रीत अलिबाबाचे भारतीय उद्योगांबरोबरचे सहकार्य आहे. भारत दौऱ्यात जॅक हे स्थानिक उद्योजकांबरोबर चर्चा करणार आहेत. येथील ‘स्नॅपडिल’बरोबरच्या संभाव्य भागीदारीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

चिनी कंपन्यांना भारताकडून आवतण
भारत- चीन या दोन देशातील व्यापार दरी कमी करण्यासाठी चीनने येथे निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक करावी, अशी इच्छा भारताच्या वतीने प्रदर्शित केली गेली. ‘अलिबाबा’चे जॅक मा उपस्थित असलेल्या ‘फिक्की’च्या व्यासपीठावरच भारताच्या वतीने चिनी कंपन्यांना आमंत्रण देणारे वक्तव्य करण्यात आले आहे. २०१३-१४ मध्ये भारत- चीन दरम्यानचा व्यापार हा ६५.८५ अब्ज डॉलर नोंदला गेला आहे. चीनमधून भारताची आयात ५१.०३ अब्ज डॉलर तर निर्यात १४.८२ अब्ज डॉलर राहिली आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षांत उभय देशांमधील व्यापार तूट ३६ अब्ज डॉलर राहिली आहे.
चीनबरोबरच्या व्यापार तुटीबाबत चिंता व्यक्त करताना भारताच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत यांनी चीनमधील कंपन्यांना येथे प्रकल्प उभारण्याची संधी असल्याचे प्रतिपादन केले. जोपर्यंत चीनी कंपन्या येथे येत नाहीत तोपर्यंत उभय देशातील व्यापार तूट भरून निघणार नाही, असा दावाही त्यांनी केला. भारतात विदेशी कंपन्यांना व्यवसाय करण्यास पोषक वातावरण निर्माण केले जावे, असा प्रयत्न सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मोदीवाणीने भारावून गेलो.. !
भारतीय उद्योजक, तंत्रज्ञ यांच्याबरोबर चीन व भारत या देशांमधील सौदार्हसंबंध अधिक दृढ करण्यात मला आनंदच होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पाहता दोन्ही देशांनी एकत्र कार्य करण्यास हीच योग्य संधी असल्याचे मला वाटते. एक व्यावसायिक म्हणून मी त्यांच्या भाषणाने भारावून गेलो आहे.    ’ जॅक मा,
संस्थापक-अध्यक्ष, अलिबाबा डॉट कॉम