भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठेतील स्पर्धा केवळ व्यवसाय क्षेत्रात वेग पकडत नसून निधी उभारणीबाबतही इरेला पेटली आहे. फ्लिपकार्टने एक अब्ज डॉलरची निधी उभारणी जाहीर केली असतानाच येथे विस्तारू पाहणाऱ्या मूळच्या अमेरिकन अमेझॉनही ही रक्कम दुप्पट केली आहे. कंपनीने दोन अब्ज डॉलरच्या निधी उभारण्याचा संकल्प सोडला आहे.
फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिनी बन्सल यांनी मंगळवारी बंगळुरु येथे पत्रकार परिषद घेऊन कंपनीच्या गुंतवणूकदारांनी एक अब्ज डॉलर गुंतविण्याचे जाहीर केले होते. या क्षेत्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार होती. मात्र आता भारतीय इ-कॉमर्स क्षेत्रातील नवा खेळाडू मूळच्या अमेरिकी अमेझॉननेही निधी उभारणीचा आपला मनोदय व्यक्त केला असून ही रक्कम स्पर्धकांच्या तुलनेत दुप्पट करण्यात आली आहे. अमेझॉनने विक्रीचे जारी केलेले उद्दिष्ट हे स्पर्धकांच्या नव्या निधी उभारणीइतकेच आहे.
फ्लिपकार्ट व अमेझॉन या एकमेकांच्या कट्टर स्पर्धक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा तर अधिक तीव्र झाली आहे. तशातच ती आता निधी उभारणीच्या क्षेत्रातही येऊ घातली आहे. गेल्याच वर्षांत भारतीय इ-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केलेल्या अमेझॉनने याचबरोबर एक अब्ज डॉलरच्या विक्रीचेही उद्दिष्ट जाहीर केले आहे.
पहिल्या वर्षांतच आपल्याला विशेषत: लघु व मध्यम उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट करत अमेझॉन.कॉमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी आगामी कालावधीत येथील व्यवसाय विस्तारासाठी ही रक्कम उपयोगी पडेल, असे बुधवारी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. भारतीय इ-कॉमर्स क्षेत्रात व्यवसायाला खूप वाव असल्याचेही ते म्हणतात.
कंपनी सध्या देशात विविध १.७ कोटी उत्पादने आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून विकते. पुस्तके, कपडे, विद्युत उपकरणे आदींची विक्री माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर होणाऱ्या भारतीय इ-कॉमर्स क्षेत्रात स्नॅपडिल, क्विकर आदीही कंपन्या आहेत. अमेझॉनने त्याच दिवशी वस्तूच्या पोचची हमी देत इ-कॉमर्स क्षेत्रात नवा पायंडा पाडला आहे. इ-कॉमर्स क्षेत्रात कंपन्यांची ग्राहक व व्यवसाय मिळविण्याची स्पर्धा इरेला पेटली असतानाच या क्षेत्रात सध्या असलेल्या कंपन्यांपैकी एकही कंपनीचा व्यवसाय नफ्यात नाही. भारतातील इ-कॉमर्स व्यवसाय हा २.३ अब्ज डॉलरचा आहे.