स्वतंत्र व्यवसायासाठी तपापूर्वी वेगळे झालेल्या अंबानी बंधूमधील सहकार्य विस्तारत चालले आहे. रिलायन्स जिओच्या बहुप्रतीक्षित दूरसंचार सेवेकरिता ध्वनिलहरी भागीदारीसाठी रिलायन्स कम्युनिकेशन्सने उत्सुकता दाखविली आहे.
थोरले बंधू मुकेश अंबानी यांची बहुप्रतीक्षित चौथ्या पिढीतील दूरसंचार सेवा डिसेंबरअखेपर्यंत येऊ घातली असून तिला आपल्या दूरसंचार सेवेसाठी लागणाऱ्या ध्वनिलहरीकरिता भागीदार करून घेण्याचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांनी ठरविले आहे.
रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील (एडीएजी) रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अनिल अंबानी यांनी याबाबतचे सूतोवाच केले. या वेळी भागधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी पत्नी टीना अंबानी याही उपस्थित होत्या.
चौथ्या पिढीतील (४जी) मोबाइल सेवेत सध्या भारती एअरटेल आघाडीवर आहे. त्याचबरोबर मोबाइल ग्राहकसंख्येतील दुसऱ्या स्थानावरील व्होडाफोनचाही विस्तार सुरू आहे. रिलायन्स जिओला यासाठीच्या सेवेकरिता २०१० मधील लिलाव प्रक्रियेत देशव्यापी परवाना प्राप्त आहे.
रिलायन्स जिओबरोबर या दूरसंचार सेवेकरिता ध्वनिलहरी भागीदारी केल्यानंतर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनलाही या सेवा क्षेत्रात एअरटेल, व्होडाफोनबरोबर स्पर्धा करता येईल. ‘मुकेशभाईंनी स्वीकारलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे’ असे अनिल अंबानी भागधारकांसमोर म्हणाले. याबाबतची चर्चा प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अंबानी बंधू २००५ मध्ये व्यवसायासाठी स्वतंत्र झाले होते. मात्र यानंतरही त्यांच्यातील व्यवसाय सहकार्य कायम होते. मुकेश यांच्या अखत्यारितील दूरसंचार व्यवसाय विभाजनानंतर अनिल यांच्या ताब्यात आला.
ऑप्टिकल फायबर जाळ्यांसाठी उभयतांमध्ये यापूर्वीच सामंजस्य करार झाला आहे. कंपन्यांमधील दूरध्वनी ध्वनिलहरी भागीदारीबाबत सरकारने नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत.

वित्त सेवा व्यवसायात जपानी हिस्सा वाढणार
रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी (एडीएजी) समूहातील विमा व निधी व्यवस्थापन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जपानची निप्पॉन आपली भागीदारी जवळपास निम्म्यापर्यंत नेणार आहे, असे अनिल अंबानी यांनी स्पष्ट केले. निप्पॉन समूह रिलायन्स लाइफ इन्शुरन्समधील हिस्सा सध्याच्या २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत तसेच रिलायन्स म्युच्युअल फंडमधील हिस्सा सध्याच्या ३५ टक्क्यांवरून ४९ वर नेणार असल्याचे अंबानी म्हणाले. अंबानींच्या नेतृत्वाखालील दोन्ही कंपन्यांची प्रमुख रिलायन्स कॅपिटल ही अन्य जपानी भागीदार सुमिटोमो मित्सुई ट्रस्ट बँकेबरोबर नव्या बँक स्थापनेकरिता पुढाकार घेत आहे.