महाराष्ट्राच्या कोकणाला भारताचा कॅलिफोर्निया बनवण्याची राज्यकर्त्यांच्या मनसुब्यांचे पुढे काय झाले माहीत नाही, परंतु अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाची फळफळावळीची समृद्धी मुंबईकरांना मात्र चाखता-अनुभवता आली आहे. कॅलिफोर्नियाची मधुर टपोरी द्राक्षे, नॉर्थवेस्टचे पीअर्स आणि वॉशिंग्टनच्या हिरव्या सफरचंदांचा हा ऐवज दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू व पुण्यातील ‘बिग बझार’च्या ७५ स्टोअर्समध्ये ‘यूएस फ्रेश फ्रूट फेस्टिव्हल’द्वारे महिन्याभरासाठी खुला झाला आहे.
भारत ही एक महत्त्वपूर्ण आणि वेगाने विस्तारत असलेली बाजारपेठ असून, अमेरिकेत पिकणाऱ्या फळांचा भारतीय ग्राहकांना परिचय करून देऊन, आगामी काळात ही ताजी फळे देशात सर्वत्र उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील वाणिज्यदूत पीटर हास यांनी व्यक्त केली.
मुंबईत कांदिवली येथील बिग बझार स्टोअरला भेट देऊन पीटर हास यांनी ‘यूएस फ्रेश फ्रूट फेस्टिव्हल’ची त्यांनी पाहणी केली. कॅलिफोर्निया टेबल ग्रेप कमिशन, पिअर ब्युरो नॉर्थवेस्ट आणि वॉशिंग्टन अ‍ॅपल कमिशन या संस्थांकडून या उत्सवाचे ‘बिग बझार’च्या सहयोगाने आयोजन करण्यात आले आहे.
या फळ महोत्सवादरम्यान विख्यात पोषणतज्ज्ञ आणि लाइफस्टाइल डिसिजेस मॅनेजमेंट कन्सल्टंट नैनी सेटलवाड यांच्याद्वारे अमेरिकी फळांपासून बनलेल्या काही खास आहार प्रकारदेखील सादर करण्यात आले.