अमेरिकेच्या हेन्स ब्रॅण्ड्सचा भारतातील व्यवसायावर अरविंद लाईफस्टाईलने ताबा मिळविला आहे. हेन्स आणि वंडरब्रा हे जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेले बॅ्रण्ड आता अरविंदच्या पंखाखाली आले आहेत. या माध्यमातून अरविंद कंपनीला ब्रॅण्डेड अंतर्वस्त्र बाजारपेठेत शिरकाव करता आला आहे.
याद्वारे येत्या चार वर्षांत कंपनी ५०० कोटी रुपयांचा महसुल मिळवेल, असा आशावाद अरविंद लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय लालभाई यांनी व्यक्त केला. याबाबतचा आर्थिक व्यवहार मात्र त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केला नाही. ब्रॅण्डेड अंतर्वस्त्र भारतीय बाजारपेठ ही १८,००० कोटी रुपयांची असून ती वार्षिक १८ टक्के दराने वाढण्याची आशा लालभाई यांनी व्यक्त केली. नव्या व्यवहारामार्फत आम्ही या क्षेत्रातील तीन टक्के बाजारपेठ मिळवू, असेही ते म्हणाले.
अमेरिकेचा हॅन्स हा ब्रॅण्ड सुमारे १०० वर्षे जुना आहे. भारतात या ब्रॅण्डअंतर्गत अंतर्वस्त्रांची ५,००० ठिकाणांहून विक्री होते. अरविंदमुळे ती आता तीन वर्षांत १५,००० विक्री केंद्रांवरून होईल, अशी माहिती अरविंद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जे. सुरेश यांनी दिली.
अरविंद लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अरविंद लाईफस्टाईल ब्रॅण्ड्सने नुकतेच देबेनहॅम्स, नेक्स्ट आणि नॉटिका या विदेशी ब्रॅण्डचा व्यवसाय ताब्यात घेतला होता. अरविंद लिमिटेड कंपनीला सध्या ४५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
भारतीय अंतर्वस्त्र बाजारपेठ
*  पुरुषांचे कपडे    ७,२०० कोटी रु.
*  महिलांचे कपडे    १०,८०० कोटी रु.
*  संघटित क्षेत्र     ६० % हिस्सा
*  असंघटित क्षेत्र    ४० % हिस्सा