भारतीय अर्थव्यवस्थेने सलग तीन दशके नऊ-दहा टक्के दराने प्रगती करायची झाल्यास भारत-अमेरिकेचे मैत्रीसंबंध वृद्धिंगत होऊन पुढच्या पातळीवर जाणे आवश्यक ठरेल, असे प्रतिपादन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी येथे केले.
सध्याच्या वांझोटय़ा आर्थिक वातावरणात ७.५ टक्के वृद्धीदराने प्रगती करीत असलेला भारत एकमेव वृद्धीचे बेट बनून पुढे आला आहे. तथापि भारताने अधिक वेगाने व सातत्यपूर्ण विकास करायचा झाल्यास भारत-अमेरिकेच्या मैत्रीने पुढचा टप्पा गाठायला हवा, असे कांत यांनी अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
गेल्या वर्षभरात भारत-अमेरिका मैत्री संबंध खूपच चांगले राहिले असले तरी त्यातून फलदायी लाभासाठी या संबंधाला आणखी अधिक उंची मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. भारतीय सेवा क्षेत्र आणि सॉफ्टवेअर कंपन्यांचे अमेरिकेत खुल्या स्वागताचे धोरण यापुढेही कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी, भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर व्यापार संबंधांनी धोरणात्मक पातळीवर वळण घेतल्याचे याप्रसंगी भाषणात मत व्यक्त केले.