जीसीएमएमएफच्या उत्पन्नात वार्षिक २३८ टक्के वाढ

दुग्धोत्पादन आणि डेअरी उत्पादनांमध्ये अग्रेसर असलेल्या अमूल नाममुद्रेचे विपणन करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) या संस्थेला सात वर्षांत संलग्न डेअरी शेतकऱ्यांचे उत्पन्न चौपटीने वाढवण्यात यश मिळाले आहे.

सहा वर्षांत आपल्या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या राष्ट्रीय ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी या संस्थेने आपले ‘अमूल मॉडेल’ सादर केले होते. गेल्या सात वर्षांत अमूल कंपनीचे शेतकरी सदस्यांना दूग्धोत्पादनासाठी दिले जाणारे दर जवळजवळ दुपटीने वाढले असल्याची माहिती अमूलने दिली आहे.

अमूलला २००९-१० साली म्हशीचे दूध २४.३० रुपये प्रति लिटर (३३७ रुपये प्रति किलो स्निग्धांश) मिळत होते. ते आता २०१६-१७ मध्ये ४९ रुपये प्रति लिटरवर (६८० रुपये प्रति किलो स्निग्धांश) पोहोचले आहे. या काळात संस्थेचे एकूण दुग्धोत्पादनही दुप्पट – ९०.९ लाख लिटर प्रति दिनवरून १७६.५ लाख लिटर प्रति दिन झाल्यामुळे शेतकऱ्यांचीही कार्यक्षमता वाढली असून गेल्या सात वर्षांत परिणामी त्यांचे उत्पन्न चौपटीने वाढले असल्याचा दावा अमूलने केला आहे.

गेल्या सात वर्षांत जीसीएमएमएफच्या उत्पन्नातील वार्षकि वाढ २३८ टक्के नोंदवण्यात आली. संस्थेची वार्षिक वाढ १९ टक्के नोंदली गेली आहे. २००९-२०१० मध्ये कंपनीचा वार्षकि व्यवसाय ८,००५ कोटी रुपये होता. तो आता २७,०४३ कोटी रुपये झाला असल्याने वाढ साडे तीन पटीने झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जीसीएमएमएफच्या ४३ व्या वार्षकि सर्वसाधारण सभेत गुजरातेतील सर्व दुग्धव्यावसायिक सहकारी संस्थांच्या महत्त्वाच्या कार्यकारिणीचे निकाल सादर करण्यात आले. जीसीएमएमएफ आणि संलग्न असलेल्या अन्य सदस्य संघटनांचा अमूल या नाममुद्रेखालील सर्व उत्पादनांचा वार्षकि व्यवसाय ३८,००० कोटी रुपये झाला आहे.

२०२०-२१ या वित्तवर्षांपर्यंत वार्षकि व्यवसाय ५०,००० कोटी रुपयांवर नेऊन भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला येण्याचा जीसीएमएमएफचा मानस स्पष्ट करण्यात आला आहे. जगभरातील दुग्धव्यवसायिक कंपन्यांमध्ये ‘अमूल’चा १३ वा क्रमांक आहे.