पुत्र जय अनमोलचे अनिल अंबानी यांच्याकडून भागधारकांपुढे कोडकौतुक

जय अनमोल संचालक मंडळात दाखल झाल्यापासून रिलायन्स कॅपिटलचा समभाग ४० टक्क्यांनी झेपावला, अशा शब्दांत आपल्या पुत्राचे कौतुक करत कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी रिलायन्स कॅपिटलसाठी हा सकारात्मक ‘अनमोल इफेक्ट’ असल्याचे नमूद केले. काही दिवसांपूर्वीच कंपनीत रुजू झालेल्या जय अनमोल यांच्या पायगुणावर रिलायन्स कॅपिटलचे कर्जही कमी होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत झाली. अनिल यांचे ज्येष्ठ पुत्र २४ वर्षीय जय अनमोल यांच्या कार्यकारी संचालकपदाला या सभेत मान्यता देण्यात आली. याबाबतचा विश्वासदर्शक ठराव सभेत मंजूर करण्यात आला. त्या वेळी अनिल अंबानी यांनी भाषण केले.

अनिल अंबानी म्हणाले की, भारतातील निम्मी लोकसंख्या ही ३० वर्षांखालील युवा पिढीचे नेतृत्व करते. खुद्द रिलायन्स समूहातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वयही ३४ वर्षे आहे. कंपनीतील तरुणांचा उपयोग भविष्यात ग्राहक तसेच भागधारक यांच्या हितासाठी सेवा पुरविण्याकरिता केला जाईल.

जय अनमोलबद्दल त्यांनी सांगितले की, जय अनमोलचे नशीब बघा. तो कंपनीच्या संचालक मंडळात आल्यापासून रिलायन्स कॅपिटलचे समभाग मूल्य तब्बल ४० टक्क्यांनी वाढला आहे. आपल्या भागधारकांसाठी हे मूल्य संपत्ती निर्माणासारखेच आहे. कार्यपद्धती सुधारणे, विकास साधणे या आधारावर ‘अनमोल इफेक्ट’ यापुढेही कायम असेल.

जय अनमोल यांची २३ ऑगस्ट रोजी रिलायन्स कॅपिटलचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. मंगळवारच्या बैठकीत त्यांना कार्यकारी संचालक म्हणून मान्यता देण्यात आली. जय अनमोल यांच्या आई व कंपनीच्या एक संचालिका टीना अंबानी यांनीही जय अनमोलला भागधारकांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास सभेदरम्यान व्यक्त केला.

ब्रिटनमधून व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या जय अनमोल यांचा रिलायन्स समूहाच्या वित्तीय सेवा व्यवसायात सहभाग राहिला आहे. रिलायन्सची भागीदार जपानी निप्पॉन लाइफच्या हिस्सावाढीच्या कालावधीत त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

वायदा व्यवहारांची पुनर्रचना

मार्च २०१७ पर्यंत रिलायन्स कॅपिटल तिच्या गृह वित्त व्यवसाय कंपनीची भांडवली बाजारात नोंदणी करेल, याचा पुनरुच्चार अंबानी यांनी या वेळी केला. कंपनीच्या संचालक मंडळावर पुत्र जय अनमोल यांची निवड झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच अंबानी यांनी याबाबतची घोषणा केली होती. याचबरोबर वाणिज्यिक वित्त पुरवठादार व विमा उपकंपनीचीही बाजारात नोंदणी केली जाईल, असे अंबानी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. वायदा वस्तूंच्या पुनर्रचनेबरोबरच खनिज तेल व हिऱ्यांच्या वायदा व्यवहारास प्रारंभ केला जाईल, अशी घोषणाही या वेळी करण्यात आली.

सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणार

रिलायन्स पॉवर तिच्या रोसा आणि बुटीबोरी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता दुप्पट करणार असून ४०० मेगा व्ॉट क्षमतेचा नवा सौर ऊर्जा प्रकल्प साकारेल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी मंगळवारी कंपनीच्या २२ वार्षिक सर्वसाधारण बैठकीत दिली. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कंपनीने गुंतवणूक व त्याचे स्थान याबाबत काहीही स्पष्ट केले नाही. कंपनीच्या रोसा (उत्तर प्रदेश) आणि बुटीबोरी (महाराष्ट्र) येथील प्रकल्पांची क्षमता दुप्पट, अनुक्रमे २४०० आणि १२०० मेगा व्ॉट होणार आहे.

‘अनमोल इफेक्ट’ने समभाग झेपावला;

रिलायन्स कॅपिटलचा समभाग गेल्या वर्षभरात ७० टक्क्यांनी वाढला आहे. जय अनमोल यांची २३ ऑगस्ट रोजी रिलायन्स कॅपिटलचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती झाली त्यावेळी हा समभाग ४६७ रु. पातळीवर होता. मंगळवारी जय अनमोल यांना कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर समभागाचे मूल्य ५५७ रुपयांपर्यंत वधारले.

आरकॉमवरील कर्जभार कमी होणार

रिलायन्स कम्युनिकेशन्सवरील ४२,६५१ कोटी रुपयांचा कर्जभार येत्या वर्षभरात ७५ टक्क्यांनी कमी करण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दिली. कंपनीच्या भागधारकांसमोर अंबानी यांनी वर्षभरात ७५ टक्के कर्ज कमी करण्यात येईल, असे सांगितले. एमटीएस व एअरसेल यांच्या विलीनीकरण प्रक्रियेनंतर २०,००० कोटी रुपयांनी कर्ज कमी होईल, असे ते म्हणाले.