१०,००० कोटींच्या व्यवसायाचे अध्यक्ष चाळके यांचे लक्ष्य

मंगळवारच्या गुडीपाडव्याला स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्रातील आघाडीच्या अपना बँक या सहकारी बँकेची वाटचाल शतक महोत्सवी शाखांकडे सुरू आहे. मार्च २०१७ अखेर ८५ शाखा पूर्ण करणाऱ्या अपना बँकेने १०० शाखांचा उल्लेखनीय टप्पा येत्या दोन वर्षांच्या आतच गाठण्याचे लक्ष्य राखले आहे.

अपना बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांरंभाच्या निमित्ताने मल्टी स्टेट शेडय़ुल्ड बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, बँकेच्या नव्या १६ शाखा या चालू आर्थिक वर्षांत नव्याने जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मार्च २०१७ अखेर बँकेच्या एकूण शाखांची संख्या आता ८५ होत आहे. शाखांचे शतक बँक येत्या दोन वर्षांच्या आत गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०२० पर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय १०,००० कोटी रुपयांच्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षांसाठी बँकेच्या एकूण व्यवसायाचे लक्ष्य यापूर्वी ६,५०० कोटी रुपयांचे निर्धारित करण्यात आले होते, अशी माहिती देत चाळके यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मधील निश्चलनीकरण प्रक्रियेमुळे ते काही प्रमाणात अपुरे होईल, अशी खंत व्यक्त केली.

निश्चलनीकरणाचा विपरित परिणाम तमाम अर्थव्यवस्थेबरोबरच सहकार क्षेत्रावर झाल्याचे नमूद करत चाळके यांनी बँकिंग व्यवस्था पूर्वपदी येण्यासाठी जुलै २०१७ उजाडेल, असे अंदाजित केले. बँकांसाठी वित्त वर्षांच्या दुसऱ्या टप्प्याचा कालावधीत वेगवान हालचालींचा असतो, असे सांगताना चाळके यांनी, नेमके याच कालावधीत निश्चलनीकरण झाल्याचे निरिक्षण नोंदविले. निश्चलनीकरणा दरम्यान अन्य बँकांप्रमाणेच अपना बँकेकडेही मोठय़ा प्रमाणात रोकड उपलब्ध झाल्याचे सांगून चाळके यांनी मात्र जुन्या नोटा ‘करन्सी चेस्ट’ बँकांकडे जमा करण्याचे तसेच नवे चलन मिळविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागल्याचेही नमूद केले. शिवाय बँकेत जमा होणाऱ्या जुन्या नोटांच्या रूपातील रकमेवर बँकेला तिच्या खातेदारांना व्याज द्यावे लागणारा अचानकचा भारही उचलावा लागल्याचे ते म्हणाले.

बँकेकडे जमा झालेली अतिरिक्त रक्कम सरकारी रोखे, म्युच्युअल फंड अशा बहुविध व सुरक्षित पर्यायात गुंतविण्याचे धोरण असेल, असे ते म्हणाले.

आज सुवर्ण महोत्सवी शुभारंभ सोहळा

मुंबईतील नायगाव, परळ, वडाळा, लालबाग या गिरणगाव म्हणून ओळखले जाणाऱ्या गिरणी कामगारांनी १९६८ मध्ये स्थापन केलेली अपना सहकारी बँक मंगळवार, २८ मार्च रोजी गुडीपाडव्याच्या दिवशी सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहे.

अपना बँकेचा हा उल्लेखनीय टप्पा मंगळवारी मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात सोहळ्याचे रूप घेणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार आनंद अडसूळ आदी उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्ताने सायंकाळी ४ वाजता किंग सर्कल, सायन (पूर्व) येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात सुरुवातीला अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.