टाटा केमिकल्समध्ये रिचा अरोरा मुख्य कार्याधिकारी
टाटा केमिकल्समध्ये वरिष्ठ स्तरावर दोन प्रमुख बदल करण्यात आले आहेत. यानुसार, कंपनीच्या ग्राहक उत्पादन व्यवसाय विभागाच्या मुख्य कार्याधिकारी म्हणून रिचा अरोरा यांची, तर कंपनीचे ‘चीफ कल्चर ऑफिसर’ म्हणून अश्विनी हिरन यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. गेल्या पंधरवडय़ापासूनचे हे बदल अस्तित्वात आले आहेत. हिरन यांना तीन दशकांचा अनुभव असून त्यांनी टाटा समूहाबरोबरच हिंदुस्थान युनिलिव्हर, आदित्य बिर्ला समूहातही कार्य केले आहे. रिचा अरोरा या ‘फाइव्ह बाय सिक्स कन्सल्टन्सी’च्या संस्थापक व मुख्य धोरण अधिकारी राहिल्या आहेत. ब्रिटानिया, बलसारासारख्या कंपनीतही त्यांनी कार्य केले आहे.
शोभना कामिनेनी ब्ल्यू स्टारच्या पहिल्या स्त्री संचालक
मुंबई : वातानुकूलित यंत्रांच्या निर्मितीतील आघाडीच्या ब्ल्यू स्टार लि.च्या अतिरिक्त संचालकपदी शोभना कामिनेनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थशास्त्रातील पदवीधर शोभना यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून आदरातिथ्य व्यवस्थापन विषयातील पदवी प्राप्त केली आहे. अपोलो फार्मसी या अपोलो हॉस्पिटल समूहाशी संबंधित कंपनीतही त्या वरिष्ठ पदावर आहेत. अपोलो म्युनिच आरोग्य विमा कंपनीच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार राहिला आहे. ब्ल्यू स्टारच्या संचालक मंडळावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
जम्मू-काश्मीर सरकारकडून ‘चितारी’चा सन्मान
मुंबई: गेली ४५ वर्षे सातत्याने काश्मीर सहली आयोजित करून १९८९ ते २००२ या अतिरेक्यांच्या उग्र कारवाया सुरू असतानाही पर्यटक नेण्याच्या प्रवाहात खंड पडू न दिल्याची उचित दखल घेत मुंबईस्थित चितारी ट्रॅव्हल्सचा जम्मू आणि काश्मीर सरकारने सन्मान केला आहे. राज्य सरकारमधील कॅबिनेटमंत्री नझीर अहमद खान (गुरेझी) यांनी अलीकडेच तेथील सचिवालयात झालेल्या समारंभात चितारी ट्रॅव्हल्सचे संचालक नारायण ऊर्फ प्रमोद वसंत चितारी यांना जीवन गौरव पुरस्कार आणि २५ हजार रुपये रोख प्रदान केले. शाही काश्मीरमधील समुद्रसपाटीपासून १८,००० फुटांपर्यंत उंच निसर्गाने नटलेल्या आणि पर्यटकांच्या दृष्टिआड राहिलेल्या गुरेझ, तुलेल, चंदीगाम, लोलाब व्हॅली, वूलर लेक आणि मानसबल यांसारख्या अप्रतिम स्थळांना चितारी यांनी आयोजित केलेल्या सहलींनी आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी उजेडात आणले, असा या निमित्ताने दिलेल्या गौरवपत्रात खास उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वीही काश्मीर सरकारने चितारी यांना काश्मीर रत्न पुरस्कार आणि ‘धाडशी प्रवासी’ अशी विशेष गौरवपत्रे दिलेली आहेत.
अपोलो हॉस्पिटल व्यवस्थापनामध्ये फेरबदल
मुंबई: अपोलो हॉस्पिटल समूहाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत फेरबदल केले आहेत. यानुसार प्रीथा रेड्डी यांना अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राइजेसच्या कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुनीता रेड्डी या अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राइजेसच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या भूमिकेत असतील. कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी शोभना कामिनेनी याही नियुक्त केल्या गेल्या आहेत. अपोलो फार्मसीचीही जबाबदारी त्यांच्याकडे असेल. संगीता रेड्डी यांच्याकडे कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार असेल. याचबरोबर कंपनीच्या संचालक मंडळाने विनायक चटर्जी यांना अतिरिक्त संचालक म्हणून मान्यता दिली आहे.
नरेंद्र सावंत बँक्स एम्प्लॉइज युनियनचे सरचिटणीस
मुंबई: को-ऑप बँक्स एम्प्लॉइज युनियनच्या सरचिटणीसपदी नरेंद्र सावंत यांची निवड करण्यात आली आहे. युनियनच्या सर्वसाधारण परिषदेत अध्यक्ष व खासदार आनंद अडसूळ यांनी ही निवड जाहीर केली. सावंत हे अपना सहकारी बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. गेल्या तीन दशकांपासून ते बँकेत युनियनचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. युनियनचे खजिनदार म्हणूनही त्यांनी यापूर्वी कार्य केले आहे.