भारतीय व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीकडे असलेला कल पाहता केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यातील गुंतवणुकीविषयी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. भारतीय लोकांकडून सोने गुंतवणूकीचा भाग म्हणून परदेशातून सोन्याच्या नाण्यांची आयात केली जाते. अशाप्रकारची सोने आयात रोखण्यासाठी सरकारने यापुढे अशोकचक्राचे चिन्ह असणारी नाणी तयार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय गृहिणींच्या दागिन्यांमध्ये अशोकचक्राचे चिन्ह असणारी नाणी दिसल्यास नवल वाटायला नको. भारतीय घरांमध्ये असणारे सोने बाजारात कसे आणता येईल, हे ध्यानात ठेवून अर्थसंकल्पामध्ये काही तरतूदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थिर व्याजदराच्या गोल्ड बाँड्सचा समावेश आहे. याशिवाय, गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना भविष्यामध्ये सोन्याच्या प्रचलित दरांनूसार परतावा मिळणार आहे. त्यामुळे या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तरल गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम उपलब्ध होणार आहे.