अर्थमंत्री जेटली यांची स्पष्टोक्ती

येत्या १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा करासाठी प्रस्तावित दररचनेत फारसा फरक नसेल. हे दर कोणाला धडकी भरेल असे धक्कादायक निश्चितच नसतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

भारतीय औद्योगिक महासंघ- सीआयआयच्या येथे आयोजित वार्षिक बैठकीत ते बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स हे या वेळी उपस्थित होते. वस्तू व सेवा करामुळे अनेकांगी करांचे प्रमाण कमी होणार असल्याने नव्याने लागू होणाऱ्या कररचनेचा लाभ कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना करून द्यावा, असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी या वेळी केले.

वस्तू व सेवा करासंबंधी तयारी अंतिम टप्प्यात असून विविध वस्तू आणि सेवांसाठी करांचे दर ठरविण्याची प्रक्रियाही लवकरच समापन होईल. नव्या कररचनेच्या निश्चितीसाठी जीएसटी परिषदेच्या आतापर्यंत १३ बैठका झाल्या असून प्रत्येक बैठकीत निर्णयासाठी मतदान वगैरे न घेता सर्व बाबी सहमतीने पार पडल्या असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

१ जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन कर रचनेतील दरनिश्चितीवर परिषदेच्या येत्या १८ व १९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. जीएसटी परिषदेने ५, १२, १८ व २८ टक्के असे करांचे चार टप्पे निश्चित केले आहेत. या दर रचनेमुळे केंदीय अबकारी शुल्क, सेवा कर, मूल्यवर्धित कर आदी सध्याचे विविध १० अप्रत्यक्ष कर हे नव्या वस्तू व सेवा करात समाविष्ट होणार आहेत.