आर्थिक विकासदर मापनाच्या सुधारित पद्धतीबद्दल सावधगिरीचा संकेत देत, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन ही ‘नुकतीच सावरत असलेली अर्थव्यवस्था’ असे केले. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)मधील सुधारणा हे आजही एक गूढ असून, खऱ्या अर्थाने ‘वाघ’ अर्थव्यवस्था म्हणून भरारी अजून दिसावयाची आहे, असे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. सुब्रह्मण्यन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाने अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा सुधारित पद्धतीनुसार, येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षांत ८.१ ते ८.५ टक्क्यांचा स्तर गाठेल आणि त्यानंतरच्या वर्षांत तो १० टक्क्यांनजीक जाईल, असे अंदाजले आहे. परंतु आकडेवारी ही फसवी असते, अशा अर्थाच म्हण उद्धृत करीत सुब्रह्मण्यन यांनी या वृद्धीच्या आकडेवारीकडे पाहताना भान हरपले जाऊ नये, असा इशारा दिला.