प्रस्तावित २५ टक्के अधिभाराने किंमतवृध्दीपूर्वी ग्राहकांची खरेदीघाई

सणांचा मोसम सुरू होण्यापूर्वीच देशातील प्रवासी वाहन क्षेत्र वाढत विक्रीवर स्वार झाले. ऑगस्टमध्ये आघाडीच्या अनेक कंपन्यांची वाहन विक्री दुहेरी अंकात नोंदली गेली आहे. वाहनांवरील अधिभार वाढण्याच्या शंकेने ग्राहकांनी तत्पूर्वीच वाहन खरेदीकडे कल दर्शविल्याचे स्पष्ट झाले. वस्तू व सेवा कर परिषदेने प्रस्तावित केलेल्या १५ वरून २५ टक्के अधिभारामुळे वाहनांच्या किमती वाढणार आहेत.

गेल्या महिन्यात मारुती सुझुकीच्या देशांतर्गत वाहन विक्रीत तब्बल २६.७ टक्के वाढ नोंदली गेली आहे. या दरम्यान कंपनीने थेट १.५२ लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला. कंपनीच्या कॉम्पॅक्ट, बहुपयोगी वाहनांना खरेदीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तुलनेत अल्टो, व्हॅगन आरसारख्या छोटय़ा गटातील वाहनांच्या विक्रीत घसरण नोंदली गेली आहे.

ह्य़ुंदाई मोटर इंडियाने ऑगस्टमध्ये ९ टक्के वाढ नोंदविताना एकूण विक्री ४७,१०३ नोंदली आहे. याच महिन्यात बाजारात आणलेल्या सेदान श्रेणीतील व्हर्ना कारला अवघ्या १० दिवसांत ७,००० खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला आहे. स्पोर्ट युटिलिटी श्रेणीतील अव्वल महिंद्र अँड महिंद्रने ७.०१ टक्के वाढ नोंदविली आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या ३९,५३४ वाहनांची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत झाली. महिंद्रची स्पर्धक टाटा मोटर्सला यंदा दुहेरी अंकातील वाहन विक्रीतील यश गाठता आले आहे. कंपनीने १४,३४० वाहन विक्रीसह १०.२९ टक्के वाढ राखली आहे. कंपनीच्या टिआगो, टिगोर, हेक्झा या नव्या वाहनांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

होंडा कार्स इंडियाच्या वाहन विक्रीत २४.५ टक्के वाढ ऑगस्टमध्ये नोंदवली आहे. कंपनीची १७,३६५ वाहने या दरम्यान विकली गेली. ट्रॅक्टर निर्मात्या महिंद्र ट्रॅक्टरने या गटातील १६,५१६ वाहने विकली आहेत. ऑगस्ट २०१६ मधील १३,५४३ ट्रॅक्टरच्या तुलनेत यंदा त्यात २१.९५ टक्के घसरण झाली आहे.

ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत घसरण नोंदविणाऱ्यांमध्ये फोर्ड इंडिया, टोयोटा किर्लोस्कर, फोक्सव्ॉगनच्या विक्रीत वार्षिक तुलनेत घसरण झाली आहे.

फोर्ड इंडिया कंपनीच्या वाहन विक्रीत ९ टक्के घसरण झाली असून कंपनीने ऑगस्टमध्ये ७,७७७ वाहने विकली आहेत, तर टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या वाहन विक्रीत ६.१२ टक्के घसरण झाली. कंपनीच्या १२,०१७ वाहनांना मागणी राहिली. जर्मन बनावटीच्या फोक्सव्ॉगनची विक्री ६.४८ टक्क्यांनी कमी होत ४,१५९ वाहनांवर येऊन ठेपली. भारतीय वाहन बाजारपेठेतील नवागत एसएमएल इसुझुला ५० टक्के घसरणीला सामोरे जावे लागले आहे. तीनचाकी वाहननिर्मितीतील अतुल ऑटोची वाहन विक्री २.७६ टक्क्यांनी वाढून ४,०२३ झाली आहे.

दुचाकींमध्ये रॉयल एनफिल्डने २१.९९ टक्के, बजाज ऑटोने अवघी १.४ टक्के, तर सुझुकी मोटरसायकल इंडियाने सुमारे ५४.२५ टक्के वाढ नोंदविली आहे. जपानी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची वाहन विक्री २६.३६ टक्क्यांनी वाढून ६.२२ लाखांवर गेली आहे. स्पर्धक हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकी विक्रीत १०.११ टक्के वाढ झाली आहे.