अविवा लाइफच्या आर्थिक साक्षरता सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतीयांसाठी कोणतेही स्वप्न हे मोठे व महत्त्वाकांक्षी नसले तरी, त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने आवश्यक आर्थिक नियोजन करण्याची तसदी फारच थोडे लोक घेतात, ही बाब खासगी आयुर्विमा कंपनी अविवा लाइफ इन्शुरन्सने रीतसर सर्वेक्षण करून पुढे आणली आहे. आर्थिक साक्षरतेबाबत भारताच्या दयनीय स्थितीला यातून पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले आहे.

अविवाने हे सर्वेक्षण देशातील सहा बडय़ा शहरांमध्ये २५ ते ४५ वयोगटातील १,११५ स्त्री-पुरुषांच्या सविस्तर मुलाखती घेऊन अलीकडे पूर्ण केले असून, त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षांची मांडणी अविवा लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी ट्रेव्हर बुल आणि मुख्य विपणन अधिकारी अंजली मल्होत्रा यांनी पत्रकारांपुढे बुधवारी केली. लोकांची त्यांच्या जीवनातील वित्तीय उद्दिष्टांबाबत स्पष्टता दर्शविणारी मानसिकता (स्वप्न निर्देशांक) आणि त्यापुढे या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी त्यांची सज्जता व नियोजन यांची चाचपणी (नियोजन निर्देशांक) अशा दोन घटकांभोवती प्रश्न गुंफून हे सर्वेक्षण पूर्ण केले गेले. त्यातून स्वप्न निर्देशांक तुलनेने चांगला ६१ अंश नोंदविला गेला असला तरी नियोजन निर्देशांक भिकार २४ अंश पातळीवर असल्याचे अगदी मुंबई, कोलकाता, दिल्लीसारख्या महानगरांतही आढळून आला.

तथापि सुखावणारी गोष्ट म्हणजे २५ ते ३५ या नव्याने नोकरी-पेशास सुरुवात करून कुटुंब बनवून स्थिर-स्थावर होऊ पाहणाऱ्या युवा वर्गाचे आर्थिक नियोजनाकडे पुरेसे गांभीर्य दिसून आले आणि नियोजनासाठी गुंतवणूक पर्यायांबाबतही त्यांच्यात अधिक जाण दिसून आली, असे अंजली मल्होत्रा यांनी सांगितले. मात्र वाढत्या वयासह, स्वप्नांचा आवाका घटत जाण्यासह नियोजनही ढिसाळ बनत गेल्याचे चित्र चाळीशी व त्यापुढील मंडळींमध्ये आढळले, अशी टिप्पणीही त्यांनी केली. हे सर्वेक्षण म्हणजे आर्थिक गरजा व सुयोग्य नियोजनातील पोकळी आजमावण्याचे पहिले पाऊल असून, संभाव्य ग्राहकांसाठी समुपदेशन व सल्ल्याचा कार्यक्रम कसा असावा याची उजळणी त्यामुळे आपल्याला करता येईल, अशी त्यांनी पुस्ती जोडली.

विमा-गुंतवणूक गल्लत

भारतात सर्रासपणे विम्याला ‘गुंतवणूक’ असेच लेबल लावले जाऊन ते विकले आणि खरीदलेही जाते. विशेषत: विमा क्षेत्र खुले केल्यानंतर आलेल्या नव्या कंपन्यांनीही प्रारंभी या चुकीच्या धारणेला हातभार लावला, अशी गंभीर टिप्पणी ट्रेव्हर बुल यांनी करून अर्थसाक्षरतेच्या अभावावर बोट ठेवले. आजही जीवन विम्याची बहुतांश खरेदी ही एक तर सुरक्षित गुंतवणूक आणि मुख्यत: कर वाचविण्याचे साधन या रूपातच होते. म्हणूनच मार्चमध्ये त्यातही करबचतीची घाई म्हणून शेवटच्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात विमा उतरविला जातो. ते म्हणाले, ‘‘आपण व्यक्तिश: ‘युलिप’ अथवा नफ्याच्या योजनांच्या विरोधात आहोत असे नाही. परंतु विमा आणि गुंतवणुकीची गल्लत होता कामा नये. जीवनांतील संभाव्य अनिश्चिततांची नेमकी व्याप्ती व स्वरूप निश्चित करून, त्यापासून सुरक्षिततेची हमी देणाऱ्या निवांत जीवनाचा मार्ग या दृष्टीनेच विम्याकडे पाहिले जायला हवे.’