बॉलीवूडमध्ये अव्वल स्थानी राहतानाच भांडवली बाजारात सक्रियता राखणाऱ्या ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनाही डॉट कॉम क्षेत्राने आकर्षित केले आहे. बच्चन पिता-पुत्राने सिंगापूरस्थित एका कंपनीत २.५० लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे.
ई-कॉमर्समधील वेगवान हालचाल लक्षात घेता यापूर्वी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी काही दिवसांपूर्वीच काही कोटींची गुंतवणूक निवडक डॉटकॉम कंपन्यांमध्ये केली होती. अमिताभ व अभिषेक बच्चन यांनी झिड्डू.कॉममध्ये जवळपास १.६ कोटी रुपये गुंतविले आहेत.
मेरिडियन टेकपीटीई प्रवर्तित ही कंपनी ई-वितरण तसेच सूक्ष्म पेमेन्ट क्षेत्रातील आहे. बच्चन हे येत्या काही दिवसांमध्ये कंपनीत आणखी पैसा गुंतवतील, असे मेरिडियन टेकपीटीईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी व्ही. एस. मीनावली यांनी सांगितले. झिड्डू.कॉमचे १.२ अब्ज संकेतस्थळदर्शक असून विविध २२५ देशांमधून महिन्याला ३० कोटी नेटधारक भेट देतात. गेल्या वर्षी २ कोटी डॉलर महसूल मिळविणाऱ्या या कंपनीचे अमेरिकेच्या नॅसडॅकच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्याची तयारी सध्या सुरू आहे.
विदेशातील कंपन्यांमध्ये थेट वैयरिक्तकरीत्या गुंतवणूक करण्याची मर्यादा रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतीच दुपटीने वाढवून ती २.५० लाख डॉलर प्रति माणशी केली होती. बच्चन पिता-पुत्राची सध्याची एवढीच रक्कम ही एकत्रित आहे. तेव्हा त्यांना उपरोक्त मर्यादेपर्यंत वैयक्तिक गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा आहे.