राज्यात अलीकडेच तब्बल १७ वर्षांनंतर खुले झालेले ८१,४५० ऑटो रिक्षा परवाने ही तीन चाकी वाहनांच्या निर्मितीतील अग्रणी बजाज ऑटो लिमिटेडसाठी मोठी सुसंधी ठरेल. सध्या दर महिन्याला ४५ ते ५० हजार ऑटो रिक्षांचे उत्पादन कंपनीकडून घेतले जात असून, आगाऊ मागणीची पूर्तता सक्षमपणे केली जाईल, असा विश्वास बजाज ऑटोचे वाणिज्य वाहने विभागाचे उपाध्यक्ष सी. के. राव यांनी सांगितले. बजाज ऑटोने अलीकडेच आरई कॉम्पॅक्ट, आरई ऑप्टिमा आणि आरई मॅक्झिमा या सुधारित तीन चाकींची संपूर्ण शृंखला बाजारात दाखल केली आहे. आरई कॉम्पॅक्ट तीन चाकी या पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही इंधन प्रकारात तसेच २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक इंजिन प्रकारात उपलब्ध झाल्या आहेत. नोंदणी, रस्ता कर, विमा आणि भाडय़ाचे मीटर वगळता या ऑटो रिक्षाच्या राज्यातील एक्स-शोरूम किमती या १ लाख ३४ हजार ते १ लाख ४२ हजारादरम्यान आहेत. कमीत कमी डाऊन पेमेंट रक्कम तसेच सुलभ व परवडणाऱ्या हप्त्यांवर ही वाहने इच्छुकांना खरेदी करण्याची सोयही कंपनीकडून केली गेली आहे.